बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्रामधील भाजप सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई करत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.
बुधवारी पहाटे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ते बार्शीत पत्रकारांशी बोलत होते. वैराग येथील बैठक संपवून करमाळ्याकडे जात असताना बार्शीत माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी थांबले होते.
याबाबत मंत्री पाटील म्हणाले, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. त्यामुळे कोणतीही सूचना न देता त्यांच्यावर ही कारवाई केली आहे हे योग्य नाही. केवळ आकसबुद्धीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सकाळी-सकाळी एखाद्या जबाबदार मंत्र्यावर कारवाई केली जाते, ही बाब गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
या देशात यापूर्वी अशी घटना घडली नाही, असे सांगत सरकारी यंत्रणांनी काही लोकांना प्रवक्तेपद दिले आहे; म्हणूनच कोणाला काहीही माहित नसताना पुढे काय कारवाई होणार याची माहिती ते देतात, अशी टीकाही किरीट सोमय्या यांचे नाव न घेता जयंत पाटील यांनी केली. या प्रकरणात नवाब मलिक खंबीरपणे भूमिका मांडतील असा आशावादही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य सरकारमधील मंत्र्यांना कितीही अडचणीत आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याने सरकार स्थिर आहे, असेही मंत्री जयंत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.