कोल्हापूर : लसीकरणाबाबत (Vaccination in India) जगाच्या तुलनेत भारत १४४ व्या क्रमांकावर आहे. कोरोना लसीकरणात मागे असतानादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहिरातबाजी सुरू आहे. निवड स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला. तसेच प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करण्याचा मोदी यांनी धडाकाच लावला आहे, असेही ते म्हणाले.
जगात कोरोना महामारीचे संकट झाल्यानंतर लसीकरण करण्यासाठी सर्वच देशांनी मोहीम हाती घेतली. मात्र, भारतात लसीकरण करण्यासाठी मोदी सरकार कमी पडले. देशात आत्तापर्यंत ७० लाख लोकांचे लसीकरण झाले. त्यामुळे दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले. तिसरी लाट येण्यापूर्वीच लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले तरच कोरोनावर आपणाला मात करता येणार आहे. पोरांना लसीकरण हा काय इव्हेंट करण्यासारखा कार्यक्रम नाही. तर ती केंद्राची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यात जाहिरातबाजी कशासाठी केली जात आहे?’ असा सवालही त्यांनी केला.
लसीबाबतची जाहिरातबाजी चुकीची
१०० कोटी लोकांना लस दिल्याची सध्या जाहिरातबाजी सुरू आहे. पण देशात फक्त ३० कोटी लोकांना लशीचे दोन्ही डोस दिलेले आहेत. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २१ टक्के आहे. जगाच्या तुलनेत लस देण्यात भारत १४४ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण लसीकरणात किती मागे आहोत हे लक्षात येईल. तरीही लसीबाबत जी जाहिरातबाजी सुरू आहे ती पूर्णपणे चुकीची आहे.
मोदींच्या वाढदिवशी ज्यादा लसीकरण
प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करण्याचा मोदी यांनी धडाकाच लावला आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी विक्रम करायचा म्हणून तत्पूर्वी चार दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले. वाढदिवसादिवशी ज्यादा लसीकरण केले. मुळात ही लस केंद्राने स्वतः विकत घेणे आवश्यक होते. पण अनावश्यक स्पर्धा केल्यामुळे लसीचा दर वाढला. खाजगी कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा डाव केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सर्टिफिकेटवर स्वतःचा फोटो छापणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान
लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर स्वतःचा फोटो छापणारे मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. किती व्यक्ती स्तोम माजवायचा? प्रत्येक गोष्ट किती इव्हेंट म्हणून साजरी करायची याला काही प्रमाण आहे का? असा सवालही त्यांनी केला.
…तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार
देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरांचा प्रश्न चर्चेत आहे. दर कमी करणार नसल्याचंही सागितले आहे. ‘केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्य सरकारही त्यावरील कर कमी करेल, त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. मात्र, सध्या पेट्रोलचे कर हेच केंद्राच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत झाले आहे. त्यावरच सध्या पगारापासून ते विकासकामांपर्यंत सर्वकाही खर्च भागवला जात आहे. यामुळे सध्याची भारताची हालाखीची आर्थिक परिस्थिती पाहता पेट्रोलचे कर कमी करतील अशी शक्यता वाटत नाही.