पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मेसच्या जेवणाचा दर्जा सुधारण्याचे नाव काही घेत नाही. मागील अनेक महिन्यांपासून विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत आहे. यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. संतप्त विद्यार्थी आणि मेस चालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील रिफेक्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना खराब पिठाच्या चपात्या व भाजी जेवायला दिली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि.22) विद्यार्थ्यांना जेवणासाठी खराब झालेल्या पिठाच्या चपात्या देण्यात आल्या. चपात्या आंबट लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडले. यानंतर विद्यार्थी आणि मेस चालकांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. चपातीसह भाजी देखील आंबट लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. चपात्यांचे पीठ हे काल मळलेले असावे असा अंदाज विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे विद्यापीठामध्ये झालेल्या या प्रकारावर सर्वजण नाराजी व्यक्त करत आहेत. सदर प्रकरणाची दखल विद्यापीठाने घेतली असून पाच हजार रुपयांचा दंड मेस चालकाला बजावण्यात आलेला आहे. मेसमधील अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाचे जेवण या समस्येकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे. भाजीचा दर्जा चांगला नाही, मेस कर्मचारी डोक्याला कॅप आणि हातात ग्लब्ज घालत नाहीत. स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीनंतर प्रत्यक्ष रिफेक्ट्रीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी जेवणाचा दर्जा सुधारवण्याच्या सूचना मेस चालकांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दंड देखील आकारण्यात आला आहे.