मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असून बॉलीवूड सेलिब्रिटींकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार होते. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची १२ हॉटेल्स आहेत. मोहित कंबोज स्वत:च्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी त्यांच्या मालकांना समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोट्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकवत असे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक यानी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरु केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरून कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील, असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
मलिक म्हणाले की, आर्यन खानला अटक झाल्यानंतर मी पत्रकारपरिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबरला मुंबईतील ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर समीर वानखेडे यांनी मोहित कंबोज यांची भेट घेतली होती. मात्र, या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे याचा व्हीडिओ माझ्याकडे नाही. परंतु, या परिसरातील लोकांनी ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर अशी भेट झाल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांना या गोष्टीची कुणकुण लागल्यानंतर समीर वानखेडे यांनी घाबरुन मुंबई पोलिसांकडे कोणीतरी माझा पाठलाग करत असल्याची तक्रार केली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचाही दावा केला मात्र, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा खळबजनक आरोप केला. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेलाच नाही. त्याला बोलावण्यासाठी प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने आग्रह केला. हे अपहरण (किडनॅपिंग)चे प्रकरण होते. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत. तो १२ हॉटेल चालवतो असा दावा मलिक यांनी केला.
मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे कंबोज फिरायचा. कंबोजने ११०० कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचे पद मिळाले. या घोटाळ्या प्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झाले, असा दावाही मलिक यांनी केला.
दरम्यान, पत्रकार परिषदेच्या आधी नवाब मलिक यांनी एक ऑडियो क्लिप ट्वीट केली. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. यात सॅनविल हा एनसीबी अधिकारी सिंह यांना नोटिशीबाबत विचारणा करत आहे. या संवादानुसार सँम म्हणजेच सँनविल आहे त्याला जूनमध्ये नोटीस दिली मात्र अद्याप कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल मलिक यानी केला.