‘आई तारी तिला कोण मारी’,‘मर्दिनी’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक
श्रेयस तळपदे प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित ‘मर्दिनी’ हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, आईच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी कथा असल्याचे समोर येत आहे. पोस्टरवरील “आई तारी तिला कोण मारी” म्हणजेच लेकरांसाठी आई ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही. हे कॅप्शन चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक देतं. आई ही फक्त प्रेम, माया आणि जपणुकीची प्रतिमा नसते, तर आपल्या लेकरांवर संकट आलं की ती कठोर आणि निर्भय रूप धारण करून त्यांचं रक्षण करण्यासाठी उभी राहते, ही भावना या कथानकातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे.
चित्रपटात एका आईचा संघर्ष, तिच्या कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य स्त्री कशी परिस्थितीशी दोन हात करते आणि वेळ आली तर ‘मर्दिनी’सारखं सामर्थ्यवान रूप धारण करते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे.
चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावीपणा मिळणार असून, बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेत भावनिक पैलू जोडणारी ठरणार आहे. कलाकारांची निवड आणि विषयाची ताकद यामुळे ‘मर्दिनी’बद्दलची उत्सुकता अधिक वाढत आहे.
अजय मयेकर दिग्दर्शित ‘मर्दिनी’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली हा चित्रपट साकारला जात आहे. सहनिर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक तसेच पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला भक्कम आधार दिला आहे.
पोस्टर लॉन्चच्या अनावरणातून ‘मर्दिनी’च्या प्रवासाची पहिली झलकमुळे या चित्रपटाबद्दलची चर्चा चित्रपटवर्तुळात रंगू लागली आहे. आईच्या प्रेम, संरक्षण आणि संघर्षाच्या भावनिक कथेला मध्यवर्ती ठेवणारा हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






