यवत : दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला.या वेळी ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
यवत येथे अनेक वर्षाची वनभोजनाची परंपरा जपत आषाढ महिन्यात एक दिवस संपूर्ण गाव बंद ठेवून गावच्या शिवेबाहेर जावून वनभोजनाचा आनंद घेतात. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत सुमारे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून गावाचे वेगाने शहरीकरण होत असुनही अनेक वर्षापासुन चालत आलेली जुनी परंपरा जपली जात आहे. सकाळी श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मीची मातेची फेरीची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. ग्रामस्थ नैवेद्य व नारळ फुडून घरे व दैनंदिन व्यवहार बंद करुन वनभोजनासाठी गावाबाहेर पडले.गावातील हॉटेल, किराणा, तसेच सर्व दुकानदारांनी दुकाने उत्फूर्तपणे बंद ठेवली होती. रविवार असल्याने बँका, शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे गावात शुकशुकाट पाहायला मिळाला.
गोडधोड जेवणावर मारला ताव
गावात येणाऱ्या बाहेरील लोकांना वनभोजनासाठी गाव बंद असल्याचे सांगितल्यावर या परंपरेबद्दल त्यांचे कुतूहल निर्माण झाले. ग्रामस्थांनी गावच्या शिवेवर, तसेच आपआपल्या शेतात सोयीनुसार समूहाने जाऊन गोडधोड जेवणासह वनभोजनाचा आनंद लुटला तर तरुणाई पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले सायंकाळी पुन्हा नागरिक गावात परत येतात.