लैंगिक समस्यांबाबत महिलांमध्ये जागरूकता करणे आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)
साधारणतः ४०% महिलांना लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो.परंतु,बहुतेक महिला लाजेमुळे ही समस्या सांगत नाही.त्रास वाढू लागल्यानंतर डॉक्टरांकडे उपचारासाठी येतात.या समस्या गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीतील हार्मोनल बदल, तसेच डायबिटीज, ताण, लठ्ठपणा किंवा पेल्विक शस्त्रक्रियेमुळे होऊ शकतात. इतक्या महिला या समस्यांनी त्रस्त असूनही वेळेवर वैद्यकीय मदत घेत नाहीत.त्यामुळे निदान आणि योग्य उपचार उशिरा होतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे.
हार्मोनल बदल, गर्भधारणा, रजोनिवृत्ती, डायबिटीज, ताण, लठ्ठपणा आणि पेल्विक शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या लैंगिक समस्यांकडे महिलांच्या लाजेमुळे आणि जागरूकतेअभावी दुर्लक्ष केले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील प्रसूतितज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीला देसाई यांनी सांगितले की, “लैंगिक समस्या केवळ पुरुषांमध्येच नाहीत तर महिलांमध्येही तितक्याच सामान्य आहेत. ४०% महिलांना लैंगिक समस्या जाणवतात आणि यापैकी अनेक प्रकरणे कधी नोंदवली जात नाहीत. कारण महिला लाजेमुळे डॉक्टरांकडे उपचारासाठी येत नाहीत यात अनेक महिलांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजन मिळण्यात अडचण येणे, वेदनादायक संभोग, योनी कोरडेपणा किंवा लघवीचे असंयम अशा समस्या जाणवतात २५ ते ३७ वयोगटातील १० पैकी ४ महिलांना योनी कोरडेपणासारख्या तक्रारी होतात शरीरातील हार्मोनल बदल, डायबिटीज, थायरॉईड किंवा पेल्विक स्नायूंची कमजोरी, तसेच मानसिक – चिंता, नैराश्य किंवा नात्यातील ताण ही यामागील कारणे आहेत.या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.या समस्या महिलांच्या केवळ लैंगिक आरोग्यावरच नाही तर संपूर्ण आयुष्यावरही विपरित परिणाम करतात.”
का वाढत आहेत पुरुष आणि स्त्रियांमधील लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली लक्षणे
सर्वात कमी चर्चा
डॉ. देसाई पुढे म्हणाल्या, “महिलांमधील लैंगिक समस्या अजूनही सर्वात कमी चर्चिला जाणारा विषय आहे. वेळेवर सल्ला न घेतल्यास समस्या वाढतात, नातेसंबंध ताणले जातात आणि आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे शांत बसू नका. लैंगिक आरोग्य हे एकूण आरोग्याचा भाग आहे, हे मान्य करून लगेच कृती करणे गरजेचे आहे. बहुतांश प्रकरणे उपचारानंतर ठीक होतात. हार्मोनल थेरपी, औषधे, पेल्विक फ्लोअर व्यायाम, समुपदेशन किंवा जीवनशैलीत बदल – जसे की ताण कमी करणे, वजन नियंत्रण, संतुलित आहार घेतल्यास लैंगिक समस्येपासून मुक्ती मिळू शकते.”
गैरसमज आणि लाजेमुळे उपाय घेत नाहीत
पुण्यातील औंध येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चाईल्ड मधील प्रसूति व स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सिनियर कन्सल्टंट डॉ. मधुलिका सिंह यांनी सांगितले की, “२०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त असतात, पण गैरसमज आणि लाजेमुळे त्याकडे दुर्लक्ष करतात बहुतांश महिला कमी लैंगिक इच्छा, उत्तेजन न होणे, वेदनादायक संभोग, योनी कोरडेपणा किंवा लघवीचे असंयम या तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात.यात २३ ते ३७ वयोगटातील १० पैकी २ महिलांमध्ये ही समस्या दिसून येतात.
हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती, गर्भधारणा, डायबिटीज, ताण किंवा लठ्ठपणा ही या समस्येमागील कारण आहेत. नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताण नियंत्रण, धूम्रपान-मद्यपान टाळणे आणि समुपदेशनाने मोठा फरक पडतो. महिलांनी कधीही लाज वाटून या समस्या लपवू नयेत. कारण वेळेवर उपचार घेतल्यास आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही परत मिळू शकतात.”