फोटो सौजन्य - Social Media
कोकण म्हटलं की निसर्गासोबतच भुताखेतांच्या गोष्टीही अनेकांच्या चर्चेत येतात. “कोकणात जाऊन एखादा गूढ अनुभव आला नाही, तर कोकणाची सफर अपुरीच,” असं म्हणणारेही बरेच जण आहेत. अशीच एक घटना मुंबईतील एका प्रसिद्ध मीडिया हाऊसमध्ये काम करणाऱ्या मित्रांच्या ग्रुपसोबत घडली. अनेक दिवसांच्या नियोजनानंतर त्यांनी अलिबागला जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी मुंबईहून निघालेला प्रवास वडखळपर्यंत अगदी सुरळीत झाला. मात्र त्यानंतर वातावरण बदलू लागलं. पौर्णिमेचा चंद्र आकाशात चमकत होता आणि मुख्य महामार्ग सोडून गाडी गावाकडच्या रस्त्यांवर शिरली.
Horror Story : दोन तासाच्या प्रवासात ‘तो’ माझ्यासोबत होता अन् अचानक… रक्ताने माखलेला मृतदेह!
मुंबईतून टाकी फुल करून निघालेली गाडी अचानक बंद पडली. डॅशबोर्डवर CNG जवळपास संपल्याचा इशारा दिसू लागला. काहीतरी बिघाड झाला असावा म्हणून चालक अरुण आणि त्याच्या शेजारी बसलेला वरुण खाली उतरले. पण ते बाहेर पडताच गाडी स्वतःहून सुरू झाली. दोघेही आश्चर्यचकित झाले, पण वेळ न घालवता पुन्हा प्रवास सुरू झाला. अरुण हा तुलनेने नवखा चालक होता. शहरातील रस्त्यांवर सावधपणे गाडी चालवणारा तो कार्ले खिंडीच्या वळणावळणाच्या रस्त्यावर मात्र अनपेक्षित वेगाने आणि आत्मविश्वासाने गाडी चालवत होता. मित्र त्याचं कौतुक करत होते, पण अरुणच्या मनात वेगळीच भीती निर्माण झाली होती. स्टेअरिंग त्याच्या हातात असलं तरी गाडीवर नियंत्रण जणू त्याचं उरलं नव्हतं. एखादी अदृश्य शक्ती त्याच्याकडून गाडी चालवून घेत असल्याची विचित्र भावना त्याला सतावत होती.
प्रवासादरम्यान त्याला शेजारी बसलेल्या वरुणच्या जागी क्षणोक्षणी एखादी विकृत आकृती दिसत होती. पुन्हा नीट पाहिलं की वरुण पूर्ववत दिसायचा. हा भास फक्त अरुणलाच होत होता. बाकी सर्वजण निवांत गप्पा मारत होते. रात्री उशिरा नागावच्या दिशेने जात असताना एक फाटा आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाडीच्या डॅशबोर्डवरील Google Maps उजवीकडे वळण्याचा मार्ग दाखवत होतं, तर त्याच मोबाईलवरील नकाशा डावीकडे जाण्याचा सल्ला देत होता. एकाच डिव्हाइसवर दोन वेगवेगळे मार्ग दिसत असल्याने सगळेच गोंधळले.
मित्रांनी सुरक्षित वाटणारा डावीकडचा रस्ता निवडण्याचा सल्ला दिला. अरुणने स्टेअरिंग डावीकडे वळवलं, पण गाडी मात्र स्वतःहून उजवीकडेच वळली. त्यानंतर सुरू झाला एक अविश्वसनीय प्रवास. अंधाऱ्या रस्त्यांवरून भरधाव धावत असलेली गाडी काही वेळाने पुन्हा कार्ले खिंडीत पोहोचली. त्यांनी आधीच मागे सोडलेला तोच रस्ता पुन्हा समोर उभा होता. थोड्याच वेळात ते पुन्हा त्याच फाट्यावर आले. पुन्हा डावीकडे वळण्याचा प्रयत्न, पुन्हा गाडी उजवीकडे. पुन्हा कार्ले खिंड. पुन्हा तोच फाटा. जणू कुणीतरी त्यांना एका न संपणाऱ्या चक्रात अडकवलं होतं.
शेवटी अरुणने कार्ले खिंडीतील जागृत पात्रू आई मंदिराजवळ गाडी थांबवली. तो मंदिरात गेला, देवीचं दर्शन घेतलं, चरणी माथा टेकला आणि प्रसादातील फूल सोबत घेऊन परत गाडीत बसला. यानंतर ते पुन्हा त्या रहस्यमय फाट्यावर पोहोचले. यावेळी मात्र तिथे दोन रस्ते नव्हतेच. फक्त डावीकडचा एकच मार्ग स्पष्ट दिसत होता. अरुणने निर्धाराने गाडी त्या दिशेने वळवली आणि काही वेळातच संपूर्ण ग्रुप सुखरूप अलिबागमधील त्यांनी बुक केलेल्या व्हिलामध्ये पोहोचला. दोन दिवसांचा आनंददायी मुक्काम संपवून मुंबईला परतताना त्यांनी पुन्हा पात्रू आई मंदिरात जाऊन कृतज्ञतेने दर्शन घेतले. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं – तांत्रिक बिघाड, मानसिक भ्रम की खरोखरच एखाद्या अदृश्य शक्तीचा चकवा—याचं उत्तर आजही त्या मित्रमंडळींपैकी कुणाकडेही नाही.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






