फोटो सौजन्य - Social Media
तीव्र उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि याचे परिणाम केवळ अस्वस्थतेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर गंभीर आरोग्य धोक्यांमध्येही रूपांतर होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक भागांत लूचा म्हणजेच गरम वाऱ्यांचा जोर असतो. या वाऱ्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर गेले की ‘हीटस्ट्रोक’ होण्याची शक्यता वाढते. हे घातक स्थिती असून, मेंदू, हृदय यांसारख्या अत्यावश्यक अवयवांवर ताण येतो आणि यामुळे मृत्यूही होऊ शकतो. विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले आणि जे आधीपासून काही आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी उष्णता अधिक घातक ठरते.
उन्हामुळे शरीरातून भरपूर घामाच्या स्वरूपात पाणी आणि क्षार बाहेर पडतात. त्यामुळे शरीरात पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलटी होणे आणि बेशुद्ध होणे असे लक्षणे दिसतात. शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेत गेले तर उपचाराशिवाय स्थिती गंभीर होऊ शकते. उष्णतेमुळे हृदयावरही ताण येतो, कारण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो, जो शरीराच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करू शकतो.
या प्रकारच्या तीव्र उष्णतेपासून बचाव करायचा असेल, तर काही सोप्या उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी पिणे. तहान लागली नाही तरीही नियमितपणे पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यासारख्या द्रव पदार्थांचे सेवन करावे. शक्यतो दुपारी ११ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. गरज असल्यास छत्री, टोपी, सनग्लासेस यांचा वापर करावा. सुती आणि हलक्या रंगाचे, सैलसर कपडे परिधान केल्यास शरीराला थंडावा मिळतो. घरातही उष्णतेपासून बचावासाठी उपाय करणे गरजेचे आहे. जसे की खिडक्यांना जाड पडदे लावणे, दरवाजे बंद ठेवणे, जेणेकरून गरम हवा आत येणार नाही. तसेच, घरातील लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
उष्णता हा केवळ हवामानातील बदल नाही, तर एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठा धोका आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणं अत्यावश्यक आहे. सतर्कता आणि सजगता हीच या संकटावर मात करण्याची खरी किल्ली आहे.