शरीरात वाढलेले युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' चटणीचे सेवन
धावपळीची जीवनशैली,कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मात्र बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय धोक्याचे ठरू शकते. हल्ली सर्वच नागरिक युरिक अॅसिडच्या समस्येने त्रस्त आहेत. शरीरात युरिक अॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात, हातापायांमधून वारंवार मुंग्या येणे, गाऊट, हाडांना सूज येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. युरिक अॅसिड वाढल्यानंतर अनेक लोक डॉटरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कोणत्या चटणीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
शरीरामध्ये प्युरिनची पातळी वाढल्यानंतर यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे दैनंदिन आहारात लो प्युरीन डाएट घेणे आवश्यक आहे. तसेच आहारात प्युरीन असलेल्या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. आहारात पुदिना, कोथिंबीर आणि आल्याचा वापर करून बनवलेल्या चटणीचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय पुदिन्याच्या पानांपासून बनवलेली चटणी यूरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी अतिशय प्रभावी ठरते.
चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिना, कोथिंबीर स्वच्छ करून धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर आणि आल्याचा बारीक तुकडा टाकून आवश्यकतेनुसार पाणी घाला. त्यानंतर बारीक पेस्ट तयार करा. चटणी बनवताना तुम्ही त्यात हिरवी मिरची आणि जिरं सुद्धा टाकू शकता. तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. या चटणीचे आहारात नियमित सेवन केल्यास सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
यूरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात चटणीसोबत योग्य प्रमाणात पाणी पिणे, पोषक आहार, नियमित व्यायाम करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. याशिवाय वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवल्यास यूरिक ॲसिडची समस्या उद्भवणार नाही. डाळी, राजमा, मांस, मद्यपान इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात यूरिक ॲसिड वाढते आणि सांध्यांमधील वेदना वाढू लागतात. यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच आहारात बदल करून आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
उच्च युरिक ऍसिड म्हणजे काय?
जेव्हा शरीरात युरिक ऍसिडची पातळी जास्त होते, तेव्हा त्याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. यामुळे गाउट (gout) सारखे आजार होऊ शकतात. सामान्यतः, 7.0 mg/dL पेक्षा जास्त पातळीला हायपरयुरिसेमिया मानले जाते.
युरिक ऍसिडची चाचणी कधी करावी?
जर तुम्हाला गाउटची लक्षणे असतील.जर तुम्हाला किडनी स्टोनची लक्षणे असतील.जर तुम्ही युरिक ऍसिडच्या पातळीवर परिणाम करणारे उपचार घेत असाल.
उच्च युरिक ऍसिड टाळण्यासाठी काय करावे?
भरपूर पाणी प्या.दारूचे सेवन कमी करा किंवा टाळा.जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.भाज्या, फळे, आणि संपूर्ण धान्ये आहारात जास्त प्रमाणात घ्या.नियमित व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा.टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.