भारत पर्व 2026'मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद
सदर महोत्सवामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक विविधता, खाद्यपदार्थ, पोशाख, हस्तकला, लोककला आणि संगीताचे अनोखे दर्शन घडले. विविधतेमध्ये एकता असल्याचा संदेश या महोत्सवामधून देण्यात आला. ‘भारत पर्व 2026’मध्ये पर्यटन विभागाच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, पर्यटन स्थळी जाण्याची सोय, उपलब्ध सोयी-सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली.
सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, युनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.
विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारक तसेच अनेक पर्यटकांनी पर्यटन विभागाच्या दालनाला भेट दिली. पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांमधील घटकांनी महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात रुची दाखविली. दालनाच्या सर्जनशील सादरीकरणाबाबत तसेच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व विविध पर्यटन क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले.
प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. राज्यातील गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे आदी पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी विशेष फायदा झाला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारकांनी महाराष्ट्र पर्यटनाबाबत जाणून घेण्यास अधिक रुची दाखविली. याचा पर्यटन क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या नक्कीच फायदा होईल”.
संचालक डॉ. बी.एन.पाटील, पर्यटन संचालनालय (भा.प्र.से.) म्हणाले की, “भारत पर्व ‘ महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांद्वारे पर्यटन सेवा-सुविधांची माहिती आदान प्रदान करण्यात आली. यामुळे विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटन वाढीसाठी मदत मिळेल. तसेच सदर महोत्सवाच्या माध्यामातून महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे”.
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.
सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.
अधिकृत संसाधने:






