त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यापासून ते आरोग्य सुधारण्यासाठी गुणकारी ठरेल 'या' फळाचा रस
वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंड आणि फ्रेश ठेवण्यासाठी नियमित ताक, लिंबू सरबत, दही, कोल्ड्रिंक किंवा इतर वेगवेगळ्या सरबताचे सेवन केले जाते. मात्र नैसर्गिकरित्या शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही बेलाच्या रसाचे सेवन करू शकता. बेलाच्या फळापासून तयार केलेला रस चवीला अतिशय गोड आणि मधुर असतो. यामध्ये असलेले घटक आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरतात. उन्हाळा वाढल्यानंतर अनेक ठिकाणी कोल्ड्रिंक्सचे सेवन करण्याऐवजी बेलाच्या रसाचे सेवन केले जाते. या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय बेलाच्या रसात विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि कोलेजन तयार करणारे घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात बेलाच्या रसाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला बेलाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
काहीवेळा त्वचेमधील कोलेजनची पातळी कमी झाल्यानंतर त्वचा काळी आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी बेलाच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात कोलेजनची निर्मिती होते आणि त्वचेमध्ये बदल दिसून येतात. याशिवाय या रसात असलेले विटामिन सी त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करते. त्वचेमधील घट्टपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करावे.
उन्हाळ्यात पचनसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर गॅस, ऍसिडिटी वाढून पचनक्रिया बिघडते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे पोट स्वच्छ राहून आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे विविध आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी बेलाच्या रसाचे सेवन केल्यास शरीर थंड राहील आणि शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल.
वाढती उष्णता आणि सतत वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याचे नुकसान होते. याशिवाय काहीवेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात बेलाच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात.