कॉर्पोरेट विश्वातील कडक फॉर्मल्स, ‘हो सर, जी सर’ करणारी संस्कृती आणि आठवड्याचे सहा दिवस जीव तोडून काम करण्याचे जुने नियम… हे सर्व स्टीरिओटाइप्स सध्या मोडीत निघत आहेत. कारण, आता कॉर्पोरेट जगतात ‘जेन झी’ म्हणजेच १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी पाऊल ठेवत असून ती स्वतःच्या अटींवर काम करत आहे. या नव्या पिढीने कॉर्पोरेटचे जुने आणि कडक नियम पूर्णपणे री-बूट करायला सुरुवात केली आहे.
‘क्वाएट क्विटिंग‘ आणि वर्क-लाइफ बॅलन्स
पूर्वीच्या पिढ्यांसाठी जास्त वेळ काम करणे म्हणजे प्रगतीचे लक्षण मानले जायचे. पण जेन झीसाठी ‘मानसिक आरोग्य‘ आणि ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ सर्वात महत्त्वाचा आहे. जितका पगार, तितकेच काम आणि ऑफिसच्या वेळेनंतर कामाचा एकही फोन न उचलणे, म्हणजेच ‘क्वाएट क्विटिंग’ हा या पिढीचा नवा फंडा आहे. ते कामाला आयुष्याचा केवळ एक भाग मानतात, संपूर्ण आयुष्य नाही.
फ्लेक्सिबिलिटी आणि ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर‘
लॅपटॉप घेऊन जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून काम करण्याची संस्कृती जेन झीने अधिक घट्ट केली आहे. नऊ-ते-पाच एकाच जागेवर बसून राहण्यापेक्षा, रिझल्ट-ओरिएंटेड कामावर त्यांचा भर असतो. ज्या कंपन्या ‘हायब्रिड’ किंवा ‘रिमोट वर्किंग’चा पर्याय देत नाहीत, अशा कंपन्यांना हे तरुण थेट नकार देत आहेत.
पारदर्शकता आणि ‘फ्लॅट‘ कल्चर
जेन झीला ‘बॉस’ आणि ‘कर्मचारी’ यांच्यातील जुनी हुकूमशाही मान्य नाही. त्यांना कामाच्या ठिकाणी पारदर्शकता, समान वागणूक आणि ‘फ्लॅट हायरार्की’ जिथे थेट वरिष्ठांशी बोलता येते हवी असते. जर कामाच्या ठिकाणी त्यांचा आदर राखला गेला नाही, तर ते लगेच नोकरी बदलण्यास मागे-पुढे पाहत नाहीत.
‘सिच्युएशनशिप’ ते ‘FWB’; ही आहे जेन झीची नवी ‘रिलेशनशिप डिक्शनरी’!
सस्टेनेबिलिटी आणि इथिक्स
जेन झी केवळ पगारासाठी काम करत नाही. ती कंपनी पर्यावरणपूरक काम करते की नाही आणि तिची सामाजिक मूल्ये काय आहेत, हे पाहूनच नोकरी निवडते.
अगदी थोडक्यात सांगायचे तर, जेन झी कॉर्पोरेट जगताला अधिक ह्युमनाईझड, फ्लेक्सिबल आणि प्रॅक्टिकल बनवत आहे. ही पिढी कामचोर नाही, तर ती स्मार्ट वर्कवर विश्वास ठेवणारी आहे. जर कंपन्यांना या हुशार आणि टेक-सॅव्ही पिढीला टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना आपले जुने स्टीरिओटाइप्स सोडून स्वतःमध्ये बदल करावाच लागेल!






