फोटो सौजन्य - Social Media
तुम्ही ब्लॅक टी, ग्रीन टी, लिंबू चहा, आलं- वेलदोड्याचा चहा असे अनेक प्रकारचे चहा पिले असतील, पण तुम्ही कधी ब्लू टी बद्दल ऐकलंय का किंवा ती प्यायली आहे का? ब्लू टी? म्हणजे नक्की काय? हेच तुम्ही सध्या विचार करत असाल ना?
ब्लू टी म्हणजे काय?
ही एक विशिष्ट प्रकारची हर्बल चहा आहे जी “बटरफ्लाय पी” या फुलांपासून बनवली जाते, ज्याला आयुर्वेदामध्ये शंखपुष्पी म्हणूनही ओळखले जाते. ही चहा दिसायला निळसर असते आणि सध्या खूप ट्रेंडिंग आहे. ब्लू टी इतर हर्बल चहासारखीच आरोग्यासाठी फायदेशीर असते.
ब्लू टीचे आरोग्यदायी फायदे:
न्युट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांच्या मते, बटरफ्लाय पी फ्लॉवरमध्ये अँथोसायनिन्स हे घटक मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित करण्यात, कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि दाह कमी करण्यास मदत करतात. यामध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म देखील आढळतात, जे नियमित वापराने शरीराला कर्करोगापासून बचाव करू शकतात.
कोणते लोक ब्लू टी टाळावीत?
जरी ही चहा आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी ती गर्भवती स्त्रिया किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी टाळावी. कारण यामुळे गर्भाशय आकुंचन पावू शकते किंवा रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. त्यामुळे ब्लू टी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ब्लू टी कशी प्यावी?
ब्लू टी पिण्यासाठी 1 ते 2 सुके बटरफ्लाय पी फुलांचे पाकळ्या उकळत्या पाण्यात टाका. त्यांना 2 मिनिटे तसेच भिजू द्या आणि मग ती गाळून प्या. तिचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस टाकता येतो, ज्यामुळे व्हिटॅमिन C चे शोषण वाढते. तसेच, तुम्ही ही चहा कॅमोमाईल टीसोबत मिसळू शकता, जी सेरोटोनिन निर्माण करून मन शांत करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
ब्लू टी पिण्याचा योग्य वेळ:
या चहाचा सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच वापर करणे उत्तम. दिवसातून फक्त एकदाच सेवन करणे योग्य मानले जाते.
( सूचना: ही माहिती केवळ सामान्य जागरूकतेसाठी आहे. हे कोणत्याही औषधाचा किंवा उपचाराचा पर्याय नाही. त्यामुळे ब्लू टीचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)