घरगुती उपाय केसांसाठी ठरतील प्रभावी
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे शॅम्पू लावले जातात तर कधी केसांची काळजी घेण्यासाठी हेअरमास्क लावला जातो. पण सतत केमिकलयुक्त प्रॉडक्ट केसांवर लावल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस अतिशय कोरडे आणि निस्तेज वाटू लागतात. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस भिजल्यानंतर ते व्यवस्थित सुकवले नाहीतर केसांमध्ये कोंडा वाढणे, केस अचानक तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांसंबधित या समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणतेही केमिकल शॅम्पू किंवा मास्क न लावता घरगुती उपाय करावे.(फोटो सौजन्य – iStock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस ओले झाल्यानंतर केस कोरडे न करता तसेच ठेवले जातात. यामुळे केसांची गुणवत्ता अधिकच खराब होऊन जाते. केसांमध्ये कोंडा किंवा केस कोरडे झाल्यानंतर घरगुती उपाय करावे. आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या घरगुती हेअरमास्कचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे हेअरमास्क केसांना योग्य पोषण देतात. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतात.
मागील अनेक वर्षांपासून केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफड जेल केसांना पोषण देते. हेअरमास्क तयार करण्यासाठी ताज्या कोरफडचा गर केसांना लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटं ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा हेअर मास्क केसांची गुणवत्ता सुधारून केस मऊ करण्यास मदत करते. कोरफडच्या रसात प्रोटीओलाइटिक एंजाइम असतात, ज्यामुळे टाळूवरील त्वचा स्वच्छ होते.
कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेसोबतच केसांसाठी सुद्धा केला जातो. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होतो. यासाठी कुलिंबाच्या पानांची बारीक पेस्ट दह्यात मिक्स करून केसांना लावावी. त्यानंतर हल्या हाताने केसांवर मसाज करून घ्या. १० मिनिटं ठेवून केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. कडुलिंबाच्या पानांचा हेअरमास्क केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि कोंडामुक्त होतात.
मेथी दाणे आरोग्यासाठी वरदान आहेत. कारण आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मेथी दाणे अतिशय गुणकारी आहे. या दाण्यांमध्ये असलेले घटक केसांची गुणवत्ता सुधारतात. यासोबतच केस मजबूत करण्यासाठी मदत करतात.हेअरमास्क बनवण्यासाठी रात्रभर भिजत ठेवलेली मेथी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्टी केसांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.