Friendship Day 2025: Millennials साठी चहाची टपरी तर Gen Z साठी रिल्स आणि सोशल मीडिया! मैत्रितील भावना त्याच, पण फरक...
Happy International Friendship day 2025: 3 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात फ्रेंडशिप डे अत्यंत खास असतो. कारण प्रत्येकाचे मित्र त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. असं म्हणतात की आपण जन्माला येण्यापूर्वीच सर्व नाती ठरलेली असतात. त्यामुळे आपण ही नाती ठरवू शकत नाही. पण आपण आपल्या आयुष्यात एक नातं नक्कीच ठरवू शकतो, हे नातं म्हणजे मैत्री. आपले आई बाबा आपल्याला नेहमी सांगत असतात की चांगले मित्र जोडा. कारण आपल्या मित्रांचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो. आपले मित्र कसे आहेत, आपली संगत कशी आहे, यावरून आपण भविष्यात किती पुढे जाणार, कोणत्या मार्गाला जाणार हे ठरतं.
जर आपण मैत्रिचा विचार केला तर पूर्वीच्या काळातील मैत्री आणि आताच्या काळातील मैत्री यामध्ये बराच फरक आहे. आता आम्ही तुम्हाला जनरेशन झेड आणि मिलेनियल्स या दोन्ही जनरेशनमध्ये मैत्रिची व्याख्या नक्की काय आहे, याबाबत सांगणार आहोत. मिलेनियल्स किंवा जेनरेशन Y म्हणजेच 1981 पासून 1996 या काळात जन्मलेली मुलं आणि मुली. तर जनरेशन झेड किंवा पोस्ट-मिलेनियल्स म्हणजेच 1997 पासून 2012 या काळात जन्मलेली मुलं आणि मुली.(फोटो सौजन्य – Pinterest)
मिलेनियल्स आणि जनरेशन झेड या दोन्ही जनरेशनमध्ये खूप फरक आहे. दोन्ही जनरेशनच्या आवडी निवडी प्रचंड वेगळ्या आहेत. त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, टिव्ही शो, सिनेमा यामध्ये बराच फरक आहे. त्याचप्रमाणे मिलेनियल्स आणि जनरेशन झेड या दोन्हींसाठी मैत्रीची व्याख्या देखील वेगळी आहे. दोन्ही जनरेशनसाठी मैत्रीच्या भावना त्याच आहेत. मात्र त्यांची मैत्री खूप वेगळी आहे.
मिलेनियल्स जनरेशनच्या काळातील मैत्री म्हणजे चहाच्या टपरीवर जमणारी मंडळी, शाळेतील बाकावर आपल्या बाजूला आपली मैत्रिणचं पाहिजे यासाठी केलेलं भांडण, वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मित्रांना 2 चॉकलेट आणि बाकी वर्गांना एकच चॉकलेट देणं. एवढंच नाही तर मिलेनियल्स जनरेशनच्या काळात फ्रेंडशिपडे साजरा करणं म्हणजे हातात फ्रेंडशिप बँड बांधण, एकमेकांच्या हातावर आपली नावं लिहीणं, ग्रिटींग कार्ड देणं. मिलेनियल्स जनरेशन एकमेकांना फोन करण्यापेक्षा प्रत्यक्षात भेटायला जात होते, आपली सुख-दु:ख शेअर करत होते.
जनरेशन झेडच्या काळातील मैत्रिचा विचार केला तर यांची मैत्री स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी संबंधित आहे. प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा फोन आणि मेसेजवर जास्त संवाद साधला जातो. सध्या फ्रेंडशिप डे ला फ्रेंडशिप बँड किंवा एकमेकांच्या हातावर आपली नावं नसतात. पण एकमेकांच्या स्टेटस आणि स्टोरीला आपले फोटो नक्कीच असतात. आता मैफिल चहाच्या टपरीवर नाही तर लाईव्ह स्ट्रिमवर जमते. आता मित्रांना ग्रिटींग कार्ड नाही तर रिल्स शेअर केल्या जातात. मैत्रीचं स्वरूप बदललं आहे, पण मैत्रितील प्रेम आणि भावना त्याच आहेत.