एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व काय आहे
सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग असून या कर्करोगामुळे दरवर्षी 3,00,000 पेक्षा जास्त मृत्यू होतात. गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरची बहुतांश प्रकरणं ही याच एचपीव्ही विषाणूमुळे होत असतात. त्यासंबंधित वॅक्सिनमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येतो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे 2030 पर्यंत एचपीव्हीचे 90 टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे.
लैंगिक दृष्ट्या सक्रिय होण्याआधी, पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. कारण एचपीव्ही संक्रमण हे लैंगिक संबंधांदरम्यान होतं आणि ही लस केवळ संसर्ग टाळू शकते, संसर्ग झाल्यानंतर ती काम करत नाही.जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या लशीचे एक किंवा दोन डोस दिले जाऊ शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना दोन किंवा तीन डोस देण्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. तेजल गोरासिया, स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एकमेव असा कर्करोग आहे जो लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येतो. प्रत्येकाने आपल्या घरातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरण करण्याची शपथ घेत त्यांना निरोगी आयुष्याची भेट देऊ शकता.
एचपीव्हीचे 100 पेक्षा जास्त प्रकार असून संक्रमणांमुळे सहसा कोणतीही लक्षणे उद्भवत नाहीत. मात्र काही प्रकारात अंगावर चट्टे उठू शकतात. हे चट्टे हातावर, पायावर, गुप्तांगांवर किंवा तोंडाच्या आत दिसू शकतात. एचपीव्ही संसर्गाच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा बहुतेक एचपीव्ही-16 आणि 18 मुळे होतो
काय आहे Cervical Cancer ची ओळख? साधेसे संकेतही ठरतील जीवघेणे
सर्वाधिक प्रमाण सर्व्हायकल कॅन्सरचे
भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे अर्थात सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख २५ हजार महिलांना या कर्करोगाचे निदान होते व त्यातील ७५ हजार जणींचा मृत्यू होतो. यातील बहुतांश, म्हणजे ९५ टक्के महिलांना ह्यूमन पापिलोमाव्हायरसमुळे (एचपीव्ही) हा कर्करोग होतो. गर्भाशय मुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
काय आहेत कारणे
असुरक्षित लैंगिक संबंध, एकाधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकालीन वापर, धूम्रपान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी, अचूक निदान आणि लसीकरण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याचे तीन प्रभावी मार्ग आहेत. या कर्करोगापासून बचाव करण्याबाबत जागरूकता खूपच कमी आहे. चिंताजनक बाब म्हणजे सर्वसाधारण १० टक्क्यांपेक्षा कमी महिला या तपासणी करतात. या कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसतानाही महिलांनी पॅप स्मीअर तपासणी करणे आवश्यक असते.
ही लस कशी देता येते
ही लस मुलींना देता येते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, २०३० पर्यंत एचपीव्हीचे ९० टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास १४० देशांनी आता एचपीव्हीचे लसीकरण सुरू केले असून साताऱ्यातील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्या वतीने २०२२ पर्यंत १५९८ महिलांनी लसीकरण केले आहे. यामध्ये २० वर्षावरील ८५६ महिला तर २० वर्षाखालील ३४५ तरुणींनी लसीकरण केले आहे. १० जून २०२३ पर्यंत ३४५ महिलांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे तर, २० वर्षांपेक्षा कमी वयातील ४३ तरुणींनी लसीकरण केल्याची माहिती डॉ. प्रसाद कवारे, बीडीएस ऑन्कोडेंटिस्ट आणि संसर्ग नियंत्रण आणि लसीकरण विभागाचे प्रमुख यांनी दिली.
Cervical Cancer: लसीकरणाने प्रतिबंध करता येणार गर्भाशयाचा कर्करोग, तज्ज्ञांचा सल्ला
कधी द्यावी लस
लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेत मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. अगदी ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील प्रौढ महिला देखील या लसीसाठी पात्र आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. रुटीन पॅप स्मीअर किंवा एचपीव्ही चाचणी ग्रीवाच्या पेशींमध्ये बदल शोधण्यात मदत करू शकते. महिलांनी वयाच्या ३० वर्षांनंतर दर पाच ते दहा वर्षांनी ही तपासणी करत राहावी. त्याच वेळी, एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांनी वयाच्या 25 व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी चाचणी घेणे सुरू केले पाहिजे.