फोटो सौजन्य - Social Media
मकरसंक्रांतीचा दिवस होता. तन्मय आणि दीप, दोघे भाऊ त्यांच्या गावातल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत एका घराच्या पडवीत बसले होते. ती ५ जणं, गप्पांमध्ये बुडाली असताना, अचानक त्यांच्या कानावर टाळ आणि मृदूंगाचे स्वर घुमतात. ते स्वर भजनाचे असतात. शेजारच्या वाडीत भजन सुरु असते. आधी त्यांच्या मनात प्रश्न येतो, आज भजन कसं? पण चला मकर संक्रांतीनिमित्त शेजारच्या वाडीने आयोजित केले असेल. आता गावी आलोच आहोत तर चला गावच्या संस्कृतीचा आस्वाद घेऊच म्हणा म्हणून तन्मय आणि दीप, दोघे त्या तीन गावकऱ्यांच्या मागे लागतात की चला जाऊच भजनाला.
ते ५ जणं, मध्य रात्रीच्या ३ वाजताच्या काळोखात वाट काढत शेजारच्या वाडीतून येत असणाऱ्या भजनाच्या नादाच्या दिशेने पाऊले टाकतात. कोकणातल्या श्रीवर्धन तालुक्यात त्यांचं गाव! आडगाव असल्याने त्या गावात इतकी विद्युत रोषणाई नव्हती. तसे त्यांच्या वाडीतून दुसऱ्या वाडीत जाण्यासाठी मध्ये एक रानाचा लहानसा टप्पा पार करावा लागतो. पण ते पार करणे त्यांना त्यादिवशी फार कठीण जात होते, कारण ती भयाण शांतता आणि त्यात वाढत जाणारे भजनाचे स्वर! त्यांना वाटलं भजनाचे स्वर वाढत आहेत म्हणजे आपण वाडीच्या जवळ पोहचतोय पण तरीही ते दुसऱ्या वाडीत काही पोहचत नव्हते. वाटेत नदी लागली, नदीचे पाणीही गुडघ्या एवढेच होते. आपली वाट काय आपल्याला गावेना म्हणून त्या पाच जणांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
माघारी परतताना ते नदीच्या इथे पोहोचले. पण यावेळी त्या नदीचे पाणी त्यांच्या गळ्याइतके झाले होते. अचानक पाणी वाढला कसा? असा प्रश्न त्यांना पडला पण त्यांनी शेजारी असणाऱ्या पुलावरून जाण्याचा निर्णय घेतला. थोड्यावेळ चालून जसा तो पूल पार केला, पुलाच्या समोर दिसणाऱ्या डोंगरावरून ढढाम… असा आवाज आला. डोंगरावरून दरड खाली कोसळत होती, याच्या नजरेसमोर डोंगराखाली असलेल्या वाडीतील काही घरं जमीनदोस्त होत होती. पण यांनी तसाच घराकडे पळ घेतला. गेल्या तासाभरापासून कानावर येत असणारा भजनाचा आवाज आता बंद झाला होता. पळत-पळत हे त्यांच्या घराच्या पडवीत येऊन बसले. पहाट होताच ते ५ जणं, ग्रामदेवतेच्या मंदिरात गेले. खोतांना घडलेला सगळं प्रकार सांगितला. खोतांनी सरळ शेजारच्या वाडीतील मंदिरातल्या भगतांकडे धाव घेतली.
भगतांनी सांगितलं की काल आमच्या वाडीत भजनच नव्हतं! हे ऐकून त्या ५ जणांची तारांबळ उडाली. मग आम्ही ऐकले ते काय होतं? त्यांनी असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या बाजूला जात होता, ती वाडीची विरुद्ध बाजू आहे. तुम्हाला त्या भजनाचा आवाज आमच्या वाडीतल्या स्मशनामधून येत होता. हा प्रकार आमच्या वाडीत अनेक लोकांबरोबर घडला आहे. पोरांनो! तुम्ही माघारी जाण्याचा निर्णय घेतलात म्हणून वाचलात नाही तर…
असं म्हणतात त्या गावात आजही रात्री भजनाचे नाद ऐकू येतात. पण यामागे काय कारण आहे? कुणालाच ठाऊक नाही.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






