स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या आजाराबाबत अधिक माहिती (फोटो सौजन्य - iStock)
जठराच्या खालील भागाच्या मागे असलेल्या स्वादुपिंडांमधील पेशींची वाढ झाल्यामुळे स्वादुपिंडाचा कॅन्सर होतो. स्वादुपिंडांमधून स्रवणारी घटकद्रव्ये अन्नाच्या पचनास मदत करतात आणि इन्शुलिनसारखे साखरेचा चयापचय नियंत्रणात ठेवणारे हार्मोन तयार करतात. स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान बहुतेकदा उशिरा होते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तो वेगाने पसरतो आणि पूर्वनिदानाचे प्रमाणही अगदीच कमी असते. पँक्रिअॅटिक डक्टल अॅडेनोकार्सिनोमा (पीडीएसी) हा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा सर्वाधिक आढळणारा तसेच तीव्र स्वरूपाचा प्रकार आहे. डॉ. रोनक ताटे, कन्सल्टंण्ट- गॅस्ट्रोएण्टरोलॉजी, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
काय आहेत पॅनक्रिअॅटिक कॅन्सरची लक्षणे
स्वादुपिंडाचा कॅन्सर पुढील टप्प्यात गेल्यानंतर भूक न लागणे, वजन कमी होणे, ओटीपोटात वेदना होऊन त्या पाठीत जाणे, कावीळ आणि मधुमेहाची सुरुवात आदी लक्षणे दिसू लागतात. मात्र, ही लक्षणे मोठ्या अन्य विकारांमध्येही आढळत असल्याने कॅन्सरचे निदान होणे कठीण असते. धूम्रपान, मद्यपान, स्थूलत्व, चिवट स्वरूपाचा पँक्रिअॅटायटिस आणि मधुमेह या अवस्थांकडे दीर्घकाळ लक्ष दिले गेले नाही, त्यांवर उपचार झाले नाहीत, तर त्यांची परिणती स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये होऊ शकते.
Cancer Awareness Month: केवळ पुरूषांनाच लक्ष्य करतात ‘हे’ कॅन्सर, 7 लक्षणे दिसताच डॉक्टरांना गाठाच
कसा होतो परिणाम
आतड्यातील मायक्रोबायोममधील (पचनाच्या मार्गात असलेले असंख्य बारीक सुक्ष्मजंतू) बदल स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या विकासावर आणि वाढीवर परिणाम करू शकतात. कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) आणि मेदाचे प्रमाण अति असलेल्या व प्रथिनांचे प्रमाण कमी असलेल्या पाश्चिमात्य आहारामुळे आतड्यातील मायक्रोबायोमच्या घडणीत बिघाड होतो असे संशोधनांमध्ये दिसून आले आहे.
मायक्रोबायोममध्ये विशिष्ट प्रकारचे हानीकारक जीवाणू असतील, तर ते कार्सिनोजीन्स तयार करू लागतात आणि त्यामुळे स्वादुपिंडांतील पेशींचे नुकसान होते आणि भविष्यात कॅन्सरला कारणीभूत म्युटेशन्स तयार होण्याचा धोका वाढतो. आतड्यातील मायक्रोबायोमच्या अवस्थेत बदल झाले तरीही त्यातून सतत दाह होत राहतो आणि त्यामुळे स्वादुपिंडांच्या पेशींमधील उतींचे नुकसान होते. आतड्यातील मायक्रोबायोम शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेवरही परिमाण करू शकतात. त्यामुळे रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण राहत नाही.
यातून रुग्ण बरे होतात का?
पीडीएसी बरा करण्याच्या शक्यतेच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांमध्ये गेल्या दशकभरात संशोधकांनी मोठी प्रगती केली आहे पण पुढील टप्प्यांवरील रुग्ण वाचण्याचा दर अगदीच नगण्य आहे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी प्रतिबंध हाच सर्वोत्तम मार्ग आहे. नियमित व्यायाम तसेच संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या व कमी मेदयुक्त प्रथिने यांसारख्या ग्लायसेमिक निर्देशांक कमी असलेल्या पदार्थांसह दाह कमी करणाऱ्या सॅलड्स, ऑलिव्ह ऑइल, मासे, फळे आणि सुकामेवा यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. मद्यपान आणि धूम्रपानही टाळणेच उत्तम. स्वादुपिंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे हे काही मार्ग आहेत.
Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी