पावसाळ्यात वारंवार सर्दी खोकला होत असेल तर 'या' पद्धतीने करा लवंग वेलचीचा वापर
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरू लागतात. सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया किंवा डायरिया सारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. तसेच आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन किंवा सतत बाहेरील तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे बऱ्याचदा दूषित पाणी पोटात जाते.यामुळे जुलाब, उलट्या, खोकला किंवा पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात थंड पदार्थ खाल्यामुळे लगेच सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत नाकातून वाहणारे पाणी आणि घश्यात होणारी जळजळ कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे छोटे मोठे आजार आणखीनच गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खोकला सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी लवंग आणि वेलचीचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सर्दी, खोकला झाल्यानंतर लवंग आणि वेलची अतिशय प्रभावी ठरते. सगळ्यात आधी गॅसवर चिमट्याच्या सहाय्याने लवंग आणि वेलची थेट भाजून घ्या. वेलचीचा रंग पूर्णपणे बदलल्यानंतर वेलची काळी होऊन जाईल. त्यानंतर वेलची आणि लवंग थंड करून चमच्याने बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर चमचाभर आल्याचा रस आणि मधामध्ये मिक्स करा. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दिवसभरात एक किंवा दोन वेळा सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. यामुळे सर्दी खोकला कमी होईल.
शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात ‘हे’ चविष्ट पदार्थ! कमी वयात हाडांमधून येऊ लागतो कटकट आवाज
सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. लवंग आरोग्यासाठी औषधी आहे. लवंगमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म सर्दी-खोकल्यातील जंतूंना नष्ट करून श्वसनमार्ग मोकळा करण्यास मदत करतात . नाकातून सतत येणारे पाणी कमी करण्यासाठी लवंग खावी. छातीमध्ये जमा झालेला कफ पातळ करण्यासाठी वेलची पावडरचे सेवन करावे. यामुळे आवाजात वाढलेली घरघर कमी होण्यास मदत होईल. आल्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. तर मध खाल्यामुळे घशातील जंतू नष्ट होतील.
सर्दी आणि खोकला होण्याची कारणे काय आहेत?
सर्दी आणि खोकला विषाणूजन्य संसर्गामुळे होतो.थंड हवामान, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, आणि वातावरणातील बदल यांसारख्या गोष्टींमुळे सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते.
सर्दी आणि खोकल्यासाठी डॉक्टरांना कधी भेटायचे?
जर लक्षणे तीव्र असतील किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकली तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. लहान मुलांना सर्दी आणि खोकला झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सर्दी आणि खोकला किती दिवस टिकतो?
सर्दी साधारणपणे ७ ते १० दिवसांपर्यंत टिकते, तर खोकला दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.