इडिओपॅथिक पल्मनरी हायपरटेंशन साठी यशस्वीपणे उपचार
मुंबई: जवळपास दोन वर्ष श्वास घेण्यास त्रास सहन केल्यानंतर चार वर्षीय मुलगी दिशा सहायने इडिओपॅथिक पल्मनरी हायपरटेंशन साठी यशस्वीपणे उपचार घेतल्यानंतर अखेर मोकळा श्वास घेतला. या आजारामुळे तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, ज्यामुळे फुफ्फुसामध्ये दबाव वाढला होता. ‘पॉट्स शण्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या मदतीने तिच्यावर उपचार करण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील पेडिएट्रिक कार्डियक सायन्सेसच्या संचालक डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या टीमने ही प्रक्रिया पार पाडली.(फोटो सौजन्य-istock)
पुण्याची निवासी असलेल्या दिशाचे दोन वर्षांपूर्वी इडिओपॅथिक पल्मनरी हायपरटेंशनसह निदान झाले होते. तिला सिंकोप व थकव्याचा त्रास होत होता. पल्मनरी हायपरटेंशनमुळे तिच्या फुफ्फुसामधील दबाव वाढत होता, पण हृदयामध्ये कोणतेही रचनात्मक दोष आढळून आले नाहीत, अन्यथा फुफ्फुसामधील दबाव अधिक वाढला असता. म्हणून या स्थितीला ‘इंडिओपॅथिक’ म्हणजेच ‘अज्ञात कारण’ असे लेबल देण्यात आले. पण, सामान्यत: जन्मजात हृदय दोषांमुळे पल्मनरी हायपरटेंशन आजार होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि फुफ्फुसामधील रक्तवाहिन्यांची भित्तिका जाडी वाढते किंवा हृदयामधील दबाव वाढून हार्ट व्हॉल्व्ह्जमधून रक्तस्त्राव किंवा ब्लॉकेज होऊ शकते किंवा फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ शकतो, जसे रक्ताच्या गाठी होणे.
हे देखील वाचा: किवी खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते का?
अशा स्थितीमुळे मुलीला खेळल्यानंतर थकवा जाणवत होता, ज्यामुळे शाळेमध्ये खेळणे किंवा दैनंदिन क्रियाकलाप करणे देखील अवघड झाले होते. असे क्रियाकलाप केल्याने तिच्या फुफ्फुसामध्ये दबाव वाढत जातो, ज्यामुळे उजव्या वेंट्रिकलवर अधिक ताण येऊन चक्कर येणे व डोळ्यासमोर अंधार येणे असे त्रास होत होते.
डॉक्टरांनी औषधोपचार करत दबावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यामधील लक्षणे कायम राहिली आणि फुफ्फुसावरील दबाव उच्च राहिला. अधिक विलंब केल्यास स्थिती गंभीर होण्यासोबत तिच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकला असता, म्हणून पॉट्स शण्टची शिफारस करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये फुफ्फुस आणि शरीरामधील दाब समान करण्यासाठी डाव्या बाजूची पल्मनरी आर्टरी आणि शरीराच्या खालील भागांकडे जाणारी थेरॅसिस ऑर्टा यांच्यामध्ये ट्यूब जोडण्यात आली.
या प्रक्रियेबाबत सांगताना फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील पेडिएट्रिक कार्डियक सायन्सेसच्या संचालक डॉ. स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या, या मुलीच्या छातीच्या डाव्या बाजूकडे ही प्रक्रिया करण्यात आली. डाव्या बाजूकडील पल्मनरी आर्टरी आकाराने मोठी होती आणि उच्च दबावामुळे आकार अधिक वाढला होता. शरीराच्या खालील भागांकडे जाणाऱ्या थोरॅसिस ऑर्टाचे (मणक्याच्या मध्यभागी असलेली धमनी) विच्छेदन करण्यात आले. ट्यूबचे एक टोक डाव्या बाजूच्या पल्मनरी आर्टरीला आणि दुसरे टोक आंशिक साइड-बायटिंग क्लॅम्प्सचा वापर केल्यानंतर ऑर्टाला जोडण्यात आले आणि छातीचा भाग बंद करण्यात आला. या मुलीने प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद दिला आणि प्रक्रिया यशस्वी ठरली.
हे देखील वाचा: तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे आहे का? रोजच्या आहारात समाविष्ट करा हा पदार्थ
शस्त्रक्रियेनंतर केअर घेत एक आठवड्याने रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. नुकतेच फॉलो-अपदरम्यान दिसून आले की मुलीला उत्तमप्रकारे भूक लागत आहे, वजन वाढले आहे आणि उत्तम लक्षणांसह आराम मिळत आहे. ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे आणि पालकांच्या देखरेखीअंतर्गत इतर मुलांसोबत खेळायला देखील सुरूवात केली आहे.