मुंबई: जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे बुधवार, ८ मार्च २०२३ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
गुरुवार ९ मार्च ते १२ मार्च दरम्यान ‘मी आनंदयात्री महिला कला महोत्सव २०२३’ हा चार दिवसीय कार्यक्रम होणार आहे. या चार दिवसात विविध कलाक्षेत्रातील महिला, मुंबईच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात ही कलेची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
[read_also content=”जागतिक महिला दिनाचं अनोखं सेलिब्रेशन, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्सचा सामना विनामूल्य पाहण्याची संधी https://www.navarashtra.com/sports/free-entry-for-all-to-see-gujrat-giants-and-royal-challengers-match-on-womens-day-nrsr-374425.html”]
गुरुवार, ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुशीला पृथ्वीराज चव्हाण प्रतिष्ठान भक्तीरंग शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम ही नृत्यकला लोअर परळच्या तेजस्विनी चव्हाण आचरेकर आणि सहकारी सादर करतील. दुपारी ३ वाजता आव्हान पालक संघ -विशेष व्यक्तिंकरिता पालकांनी चालवलेली कार्यशाळा या शाळेची मुले आपली कला सादर करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता सोलापूरचे स्वरश्री महिला भजनी मंडळाच्या मंगला अरुण बाबर आणि त्यांच्या सहकारी विविध कलागुण दर्शन भजनाद्वारे मंत्रमुग्ध करतील. सायंकाळी ७ वाजता “नाच गं घुमा” द्वारे पनवेलच्या सुनीता खरे आपल्या सहकाऱ्यांसह अन्नपूर्णा स्तोत्र, जागर शक्तीचा, भारूड, टिपऱ्या कला सादर करतील. रात्री ८ वाजता डोंबिवलीचे ‘मी एकलव्य आर्ट फाऊंडेशन’चे समृद्धी चव्हाण, सुनीता पोद्दार ग्रुप परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या दिवसाची सांगता रात्री ९ वाजता विलेपार्ले येथील रंगवेधचे कलाकार प्रस्तुत ‘तेथे कर माझे जुळती’ कार्यक्रमाने होईल.
तिसऱ्या दिवशी शुक्रवार, १० मार्च रोजी दुपारी २ वाजता पुण्याच्या मुक्ता बाम आणि सहकारी ‘यात्रा- वारीचा प्रवास’ हा कार्यक्रम सादर करतील. तर दुपारी ३.३० वाजता दादरची आचार्य अत्रे समिती ‘अत्रे कट्टा’ द्वारे महिलांशी संलग्न कायद्याची माहिती देतील. संध्याकाळी ५ वाजता ‘व्हय! मी सावित्रीबाई’ हा क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंवरील कार्यक्रम उज्वल मंत्री आणि त्यांचे सहकारी सादर करतील. सायंकाळी ६ वाजता संपदा जोगळेकर- कुलकर्णी आणि हर्षदा बोरकर ‘स्त्री’कविता/ अभिवाचन/ कथा सादर करतील. सायंकाळी ७ वाजता कामोठे, नवी मुंबई येथील ‘सॅलिटेशन डान्स अकॅडमी’च्या दीपिका आनंद आणि सहकारी कथ्थक या भारतीय नृत्यशैलीचे सादरीकरण करतील. शेवटी खोपोली/ डोंबिवली येथील ज्योती शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह रात्री ८ वाजता ‘ओवी रंग- ओव्या जात्यावरच्या, गप्पा नात्यावरच्या’ हा कार्यक्रम सादर करतील.
शनिवार, ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ‘पंचमी कला अकादमी’ च्या वैशाली जोशी आपल्या सहकाऱ्यांसह महिला दिन स्पेशल कथ्थकने दिवसाची सुरुवात करतील. दुपारी २ वाजता ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ द्वारे शुभा जोशी सहकाऱ्यांसह सकारात्मक व आनंददायी गाणी गातील. दुपारी ४ वाजता ‘पु.ल.देशपांडे कला अकादमी’ आणि सखी मंचच्या वतीने ‘जल्लोष आरोग्याचा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. डोंबिवलीच्या श्वेता राजे सहकाऱ्यांसह ‘सूर निरागस’ हा संत साहित्यावरील मराठी वाद्यवृंद सादर करतील. शनिवारी रात्री ८ वाजता घाटकोपरच्या विधी साळवी त्यांच्या बॅडसह फ्युजन ब्रँड ग्रुप द्वारे गोवा वसईची फ्युजन मधुर गाणी सादर करतील.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अर्थात रविवार- १२ मार्च रोजी सकाळी १० ते २ वाजता मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे विद्यार्थी विविध कलागुणांचे सादरीकरण करतील. दुपारी २ वाजता ‘मुद्रा क्रिएशन’च्या माध्यमातून सुगंधा धुळप सहकाऱ्यांसह लोकनृत्य सादर करतील. सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील आणि सहकारी ‘नित्या आर्टिस्ट सेंटर’ संवाद -मी आनंदयात्री हा कार्यक्रम सादर करतील. रात्री ८ वाजता ‘भैरवी’ मिले सूर मेरा तुम्हारा, स्वरवंदना- लतादिदींच्या गाण्यांचे सादरीकरण भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयाचे संस्थाचालक पंडित उपेंद्र भट आणि त्यांच्या विद्यार्थिनी करतील. या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होईल.
समारोपाचे आभार प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे करतील.कलादालनात गीत-दीप आर्टचे स्नेहल प्रदीप आणि ग्रुप यांचे स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित रांगोळी प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल.
‘मी आनंदयात्री’ हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागी महिला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी केले आहे.