सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचा मानला जातो. अनेकदा डॉक्टारांद्वारेही आपल्याला नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी मदत करत असतो. मात्र रोजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण सकाळचा नाश्ता करणे टाळतात. नाश्ता न केल्याने जरी कोणते विशेष नुकसान होत नसले तरी महिनाभर ते सतत वगळल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा नक्की काय परिणाम होतो, ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
बेंगळुरूमधील फोर्टिस हॉस्पिटल्सच्या सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “नियमित नाश्ता केल्याने पचनाची समस्या नाहीशी होते. याउलट नाश्ता न केल्यानं टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.”याव्यतिरिक्त ते सांगतात की, जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्समधील एका अभ्यासात असे आढळून आले की, नाश्ता वगळल्याने नंतरच्या काळात रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिन वाढते आणि यामुळे पचनाला त्रास होतो. त्यामुळे महिनाभर सकाळचा नाश्ता न केल्याने हार्मोनल असंतुलनामुळे ऊर्जेमध्ये चढ-उतार, थकवा यांसारखे परिणाम वाढू शकतात.
डॉ. श्रीनिवासन यांचे असे मत आहे की, नाश्ता वगळणे आणि वजन यांच्यातील संबंधांवरील संशोधन गुंतागुंतीचे आणि अनेकदा परस्परविरोधी आहे. नाश्ता वगळणे हे वजन वाढण्याशी आणि लठ्ठपणाचा धोका वाढण्याशी संबंधित आहे. पुढे डॉक्टर यांनी सांगितले की, नाश्ता वगळणे आणि वजन वाढणे यांच्यात कोणताही संबंध जरी आढळत नसला तरी काही प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, वजन कमी होण्यासही मदत झाली. याचे अधिक परिणाम जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा – सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
मेटाबॉलिक सिंड्रोम
एका रिपोर्टनुसार, नाश्ता वगळणे हे मेटाबॉलिक सिंड्रोमच्या उच्च जोखिमेशी संबंधित आहे ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग
जे लोक सतत नाश्ता वगळतात त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांचा धोका अधिक असतो.
पौष्टिक कमतरता
नाश्ता वगळल्यामुळे जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचे सेवन अपुरे ठरू शकते. ज्याचे आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.