भारतातील महिलांच्या हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी) हा आजार बहुतेकदा पुरुषांना प्रामुख्याने प्रभावित करणारा आजार मानला जातो. प्रत्यक्षात, महिलांना देखील या आजाराचा तितकाच धोका आहे. त्यांना वारंवार अँजाइनासारखी लक्षणे जाणवतात, जसे हृदयात रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे छातीत दुखणे. असे असताना देखील महिलांना अजूनही निदान आणि योग्य उपचार मिळत नाहीत, याचे मुख्य कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार सांधे दुखतात? मग दह्यात मिक्स करून खा ‘या’ बिया, वयाच्या १०० व्या वर्षी हाडे राहतील मजबूत
भारतात, सीएडी मृत्यूसाठी प्रमुख कारणीभूत आजार आहे, ज्याचा मृत्यूदर जागतिक सरासरीपेक्षा २० ते ५० टक्के जास्त आहे. डब्ल्यूएचओनुसार, २०२२ मध्ये भारतात ४.७७ दशलक्षहून अधिक मृत्यू सीएडीमुळे झाले. या आकडेवारीमधून विशेषतः महिलांसाठी अधिक जागरूकता आणि सक्रिय आरोग्यसेवा हस्तक्षेपाची त्वरित गरज असल्याचे दिसून येते.
रुग्णांकरिता, विशेषतः ज्यांना हृदयरोगाच्या काळजीमध्ये अनेकदा दुर्लक्षित केले जाणाऱ्या महिलांकरिता गंभीर हृदयविकाराच्या घटनांचा धोका कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन परिणाम सुधारण्यासाठी अँजाइनाचे लवकर निदान व प्रभावी व्यवस्थापन याबद्दल जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे.
छातीत दुखणे, दाब येणे, जड वाटणे किंवा अकडणे ही चिन्हे दिसून येणारे अँजाइना हे सीएडीचे सर्वात सामान्य लक्षण आहे. यामुळे रूग्णाच्या जीवनाच्या दर्जावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. महिलांमध्ये अँजाइनाची विशिष्ट लक्षणे आढळून येतात, जसे जबडा किंवा मान दुखणे, थकवा आणि छातीच्या बाहेर अस्वस्थता, ज्यामुळे वेळेवर व अचूक निदान अधिक आव्हानात्मक होऊ शकते. यामुळे डॉक्टर अँजाइनाच्या मूळ कारणांचे निराकरण न करता आराम देणारा उपचार करतील, परिणामत: रूग्णांनी त्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास प्रकृती अधिक खालावू शकते.
अॅबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्सच्या प्रमुख डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, ”अलिकडील वर्षांत, वाढत्या संशोधनामुळे सीएडीच्या व्यक्तींवर होणाऱ्या परिणामाबद्दलची माहिती अधिक सखोलपणे मिळाली आहे. महिलांना वेळेवर हृदयरोगाची काळजी घेण्यासाठी अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागतो, जसे उपचार घेण्यास विलंब, ज्यामुळे जास्त धोका निर्माण होऊ शकतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि अँजाइनाचे निदान व व्यवस्थापन वाढवण्यासाठी, अॅबॉटने असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय)सोबत सहयोगाने ओपीटीए (ऑप्टिमल ट्रीटमेंट ऑफ अँजाइना) टूल्स लाँच केले. अँजाइनासह जगणाऱ्या व्यक्तींकरिता उत्तम काळजी आणि सुधारित परिणाम सुनिश्चित करण्यासाठी हे टूल्स डिझाइन केले आहेत.”
तीन अद्वितीय टूल्स आहेत: ओपीटीए क्लिनिकल चेकलिस्ट, ओपीटीए प्रश्नावली आणि ओपीटीए दृष्टिकोन, जे अनुक्रमे अँजाइनाचे निदान, पूर्वानुमान आणि वैद्यकीय व्यवस्थानास साह्य करतात. एपीआयने क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ओपीटीए टूल्सची शिफारस केल्यामुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांना वेळेवर निदान करण्यास मदत होईल, जे अँजाइनाच्या सानुकूल व्यवस्थापनाच्या दिशेने पहिले पाऊल आहे.
इंदौरमधील अपोलो हॉस्पिटल्सच्या सीनियर इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट व कॅथ लॅबच्या संचालिका डॉ. सरीता राव म्हणाले, ”महिलांमध्ये हृदयरोगाचे निदान करण्यामधील मोठे आव्हान म्हणजे सामान्य समज, तो म्हणजे त्यांना हृदयरोग होण्याचा धोका कमी आहे. सीएडी सारखा हृदयरोग महिलांना पुरूषांच्या तुलनेत एक दशकानंतर होतो हे खरे असले तरी या विलंबाचा अर्थ महिलांना हृदयरोग होणार नाही असा होत नाही. महिलांना हृदयरोगाच्या धोक्यांबाबत जागरूक केल्याने आणि लवकर धोक्याची लक्षणे ओळखण्यास मदत केल्याने मोठा बदल घडून येऊ शकतो. यामुळे महिलांना जीवनशैलीमधील बदल आणि वेळेवर वैद्यकीय केअरचे महत्त्व याबाबत जागरूकतेसह सक्षम करणे महत्त्वाचे आहे.”
वयाच्या ७५ वर्षांनंतर कार्डियोव्हॅस्कुलर डीसीजच्या (सीव्हीडी) रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असते. अँजाइनाशी जवळचा संबंध असलेल्या लठ्ठपणा सारख्या स्थिती पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त प्रभावित करतात. बरे होण्यासाठी वेळेवर उपचार न मिळाल्याने पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कमी निदान होण्याची शक्यता ५० टक्के जास्त असते.
योग्य व वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास आजार वाढणे मंदावते, लक्षणे कमी होतात आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. भारत हृदयरोगाच्या वाढत्या प्रमाणाचा सामना करत असताना निदान, उपचार आणि आजार व्यवस्थापनात महिलांना भेडसावणाऱ्या अद्वितीय आव्हानांचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे. लवकर निदान व योग्य माहितीसह महिलांचे सक्षमीकरण करणे हे सध्याच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि निष्पत्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे.