Moshi Garbage Depot: PCMC Initiates Rs 10 Lakh Compensation Process For Families Of 9 Victims
Moshi Garbage Depot Accident: मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 9 नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीसीएमसीचे महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही मदत तातडीने वितरित करण्याचे काम सुरू कऱण्यात आले आहे. मृत अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मृत अक्षय सावंत (वय 32) यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात 10 लाख रुपयांची आर्थिक मदत वर्ग करण्यात आली.
10 लाख रुपयांच्या मदतीपैकी मृत अक्षय सावंत यांच्या पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात 34 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी 33 टक्के रक्कम वर्ग करण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
विजय सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृत भावेश वाणी, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जलद गतीने सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे.
अशा दु:खाच्या काळात बाधित कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तसेच शहरातील सर्व कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्यात येत आहेत.






