फोटो सौजन्य: Pinterest
“आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती” एकादशी आषाढातली असो किंवा कार्तिक महिन्यातली. वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या काही कमी नाही. पंढरीच्या राजाची ही वारी अनुभवणं हा नेत्रदिपक सोहळा असला असून लाखो वारकरी चंद्रभागेच्या तिरी दाखल होतात. हा पंढरीचा राजा भक्तांसाठी जरी माऊली असला तरी त्याचा थाट हा न्याराच आहे. पंढरीच्या राजाचं सोन्याच्या दागिन्यांनी मढलेलं रुप पाहणं मनमोहक आहे. एकादशीच्या निमित्ताने आणि इतर सणावाराला देखील सोन्याचे पारंपरिक असे दागिने या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तिला चढवले जातात. याच पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांची माहिती जाणून घेऊयात.
वारकरी संप्रदायाला मोठा इतिहास प्राप्त आहे. त्यामुळे पुर्वीच्या काळातील अनेक विठ्ठलभक्तांनी पंधरीच्या राजाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेलं होतं. हे आधीच्या काळातील परंपरिक दागिने आजही जपून ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचा काळ जाणून घ्यायचा झालाच तर अंदाजे हे 700 वर्ष जुने दागिने असल्याचं म्हटलं जातं. पुर्वीच्या काळी असलेल्या राजे-महाराजांनी दान केलेले कोणते दागिने कधी चढवायचे याबाबत देखील विशेष काळजी घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस यांनी अनेकदा श्री विठ्ठल-रुक्मिणीला हे मौल्यवान दागिने अर्पण केले होते.
असा आहे पंढरीच्या राजाच्या दागिन्यांचा इतिहास
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा अशी ज्याची ख्याती सांगितली जाते तो विठ्ठल आणि त्याची अर्धांगिनी रुक्मिणीदेवी यांना त्याकाळी मौल्यवान आणि आता दुर्मिळ होत गेलेल्या दागिन्यांची आभुषणं चढवली जातात कोणते आहेत ही दागिने पाहुयात.पुर्वीच्या राजेमहराजांनी विठ्ठलाला सोन्याचं सोवळं (धोतर) दान केलं होतं. त्याचबरोबर हिऱ्यांचा दुर्मिळ असा कंबरपट्ट्याचा समावेश देखील या दागिन्यांमध्ये आहे. हिऱ्यांनी नक्षीकाम केलेला कंबरपट्टा हा तेव्हाचे प्रसिद्ध सोनार नरहरी सोनारांनी घडवला आहे असं असा संदर्भ सांगितला जातो. फक्त हेच दागिने नाही तर दंडाला बाजुबंद, दंडपेट्या, हातात तोडे, सोन्याची राखी अशी सोन्याची आभुषणं आहेत. गळ्यामध्ये सोन्याची तुळशीची पंचेचाळीस पाने असलेली सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ आहे.
त्याचबरोबर कौैस्तुभणी हा अलंकार खास विठ्ठलाच्या गळ्यात पाहायला मिळतो. कौैस्तुभणी या दागिन्याचं नावाच मुळी विठ्ठलाशी जोडलेलं आहे. पाचूंनी रत्नजडित असलेला हा कौैस्तुभणी विठ्ठलाच्या सौंदर्यात भर घालतो. असं म्हणतात की हा कौैस्तुभणी बाजीराव पेशव्यांनी अर्पण केला होता. विठ्ठल हा फक्त हिंदूचाच नाही तर मुस्लिम समाजात देखील विठ्ठलाचे भाविक आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा देखील आहेत. या काही दागिन्यांवर उर्दू आणि मोडी लिपितील काही मजकूर आहे.
याबरोबर रुक्मिणीला देखील मोठ्या प्रमाणात दागिने आहेत. पायात सोन्याचे पैंजण आणि वाळेआहेत. बारिक सोन्याचा पातळ थर असलेली साडी. दोन कंबरपट्टा आहेत. माणिक, पाचू जडवलेले बाजुबंद आहेत. गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार,चपलाहार, पेट्यांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा असे कधीही न ऐकण्यात आलेले दागिन्यांनी विठ्ठल रखुमाईचं रुप साजेसं दिसतं.