 
        
        लहान मुलांचा ताप आल्यावर कसं रिकव्हर होणार (फोटो सौजन्य - iStock)
व्हायरल फिव्हर नंतर मुलांना अशक्तपणा येणे ही एक सामान्य बाब आहे. संसर्गाशी लढण्यासाठी मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रौढांच्या तुलनेने अधिक खूप मेहनत घ्यावी लागते. यामुळे मुलांना काही दिवस शारीरिक ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू लागते. विषाणूजन्य आजारानंतर अशक्तपणा येणे नैसर्गिक आहे, परंतु मुलांची योग्य काळजी घेतल्यास त्यांना लवकर बरे होण्यास मदत होते.
भारतात अनेक मुलं ही विषाणूजन्य(व्हायरल) संसर्गातून बरे होत आहेत आणि त्यांना तीव्र ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. या टप्प्यात, पालकांनी भूमिका महत्त्वाची ठरते. अशावेळी काय करावे आणि काय करू नये याबाबत विशेष माहिती तज्ज्ञांनी या लेखाच्या माध्यमातून दिली आहे. डॉ. प्रशांत लक्ष्मणराव रामटेककर, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी खास टिप्स दिल्या आहेत.
काय कराल?
पुरेसा विश्रांती आणि झोप घ्या: विश्रांती ही शरीराला स्वतःला बरे करण्याची संधी देते. विषाणूजन्य तापातून बरे होणाऱ्या मुलांना दररोज रात्री त्यांच्या वयानुसार झोपेची आवश्यकता भासते. प्रीस्कूलर (३ ते५ वर्षे): १० ते १३ तास , प्राथमिक शाळेतील मुलं (६-१२ वर्षे): ९ ते १२ तास, किशोरवयीन मुले (१३ ते १८ वर्षे): ८-१० तास. शिवाय, अधूनमधून विश्रांती घेतल्यास मुलांना ताजेतजावे वाटते. मुलाला बरे वाटेपर्यंत शाळेत किंवा शिकवणीला पाठवू नका.
ताप आल्यानंतर लहान मुलांना स्पंजिंग कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
मुलांना हायड्रेटेड ठेवा
तापामुळे घाम येणे किंवा द्रवपदार्थांचे सेवन कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या सतावते. मुलांनी दिवसभर नियमितपणे पाणी, सूप, नारळ पाणी, ताक किंवा लिंबाचा रस प्यावा. ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज सुमारे ५ कप (१.२ लिटर)तर ,९ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज ७ ते ८ कप (१.६-१.९ लिटर), किशोरवयीन मुलांनी(१४-१८ वर्षे)दररोज ८ ते ११ कप (१.९-२.६ लिटर) पाणी प्यावे.जर मुल पुरेसे पाणी पित नसेल तर त्यांना डिहायड्रेशनची समस्या सतावू शकते म्हणून हायड्रेशन अतिशय गरजेचे आहे.
संतुलित, पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करा
पालकांनी आपल्यांना मुलांना हलके, घरी शिजवलेले, ताजे अन्न द्यावे . जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स कमतरता भरुन काढण्यासाठी फळे, भाज्या, प्रथिनयुक्त आहार, अंडी, दही, प्रोबायोटिक्स आणि रोगप्रतिकारक शक्ती पुनर्संचयित करण्यासाठी तृणधान्य आणि सूपचा आहारात समावेश करा.
लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
१० ते १४ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारा थकवा किंवा चक्कर येणे, हृदयाचे वाढलेले ठोके किंवा दम लागणे यासारखी लक्षणं दिसताच त्वरित तपासणी करा. हे मायोकार्डिटिस किंवा अशक्तपणा सारख्या विषाणूजन्य गुंतागुंती दर्शवितात.
पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; ‘या’ तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
या गोष्टी टाळाच
मूल पूर्णपणे बरे होईपर्यंत शारीरिक श्रम करणे, खेळणे किंवा शाळेत पाठविणे टाळा. जास्त श्रम केल्याने थकवा येतो आणि बरे होण्यास आणखी वेळ लागतो. मुलांना जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ देणे टाळा. तळलेले, शर्करायुक्त किंवा प्रक्रिया केलेले अन्न पचनक्रिया मंदावतात आणि बरे होण्याचा कालावधी वाढतो. त्याऐवजी, सौम्य, पौष्टिक आणि घरी तयार केलेल्या अन्नाचे सेवन करा.
मुलांना कॅफिन युक्त द्रव आणि एनर्जी ड्रिंक्स देणे टाळा: कॅफिनमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो आणि मुलांमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. पूर्णपणे बरे होईपर्यंत चहा, कॉफी, कोल्ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक्स पूर्णपणे टाळा.
मुलं पुरेशी विश्रांती आणि झोप घेतील याची खात्री करा, संतुलित आहारासह योग्य हायड्रेशन गरजेचे आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांसह पौष्टिक आहार तितकाच महत्वाचा आहे. जंक फूड, कॅफिनयुक्त द्रव आणि अतिश्रम करणे टाळा. योग्य काळजी घेतल्यास, बहुतेक मुलं ताप कमी झाल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांत पूर्ववत उर्जा प्राप्त करतात.






