कामानिमित्त किंवा दिवसभर ऑफिसमध्ये बूट घालून फिराव्या लागणाऱ्या व्यक्तींनी बूट काढले की तळपायाला वास येण्याचा अनुभव घेतला असेलच. तो टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अगदी परफ्यूमही वापरला जातो. पण तरीही ही दुर्गंधी जात नाही. त्यामुळे अर्थातच आपल्याला खूप लाज वाटते.पायांना येणाऱ्या या दुर्गंधीला ब्रोमिहाईड्रोसिस या नावानेही ओळखले जाते. मुळातच हा प्रश्न उद्भवतो तो पायाला येणारा घाम न सुकल्यामुळे. सर्वांच्याच शरीरावर जीवाणू असतातच पण काही व्यक्तींचा पायाचा घाम न सुकल्याने तो या जीवाणूंच्या संपर्कात येतो आणि पायाला घाण वास येऊ लागतो. काही घरगुती उपायांनी पायांची येणारी दुर्गंधी कमी करता येऊ शकते.
जर शक्य असेल आणि ३ ते ४ दिवस बूट घातला नाही तरी चालणार असेल, तर हा उपाय करता येईल. ओलसर बुटांमधून जास्त दुर्गंध येतो. त्यामुळे ओलसर बूट एकदा साबण किंवा वॉशिं्शग पावडर लावून चांगले धुवून घ्या. आणि उन्हामध्ये २ ते ३ दिवस ते चांगले वाळू द्या.यामुळे बुटांमधली दुर्गंधी चटकन कमी होते. बाहेरून आल्या आल्या बुट कपाटात किंवा शू रॅकमध्ये बंद करून ठेवण्याची सवय अनेक जणांना असते. असे बंद कपाटात ठेवलेले बूट मग थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे कमीतकमी १० तासांनंतर बाहेर निघतात. त्यामुळे त्यांचा दुर्गंध आणखी वाढतो. कारण आपण बूट घालून बाहेरून जेव्हा येतो तेव्हा पायांना घाम आलेला असतो. घामामुळे बुटही ओलसर झालेले असतात. म्हणून बुटांचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत किमान २ तास तरी ते मोकळ्या हवेत ठेवा.
बुटांमध्ये तुम्ही तुमचं नेहमीचं टाल्कम पावडर थोडं टाकून ठेवा. यामुळे बुटांमधला ओलसरपणा आणि दुर्गंध दोन्हीही शोषून घेतल्या जाईल तसेच पावडरचा सुवास बुटांना लागेल. आजकाल मेडिकेटेड फूट पावडर देखील मिळतात. या पावडर बुटांमध्ये टाकून ठेवल्याने त्यांच्यात फंगसची होणारी वाढ रोखली जाते आणि त्यामुळे आपोआपच घाण वास येणं कमी होतं. जाडसर सॉक्स घालत असाल तर तळपायांना जास्त घाम येतो आणि दुर्गंधी वाढते. त्यामुळे sweat-wicking सॉक्स घालण्यास प्राधान्य द्या. यामुळे घाम कमी येतो. तसेच कॉपरचा बेस किंवा रबराचा बेस असणारे सॉक्सही बाजारात मिळतात. हे सॉक्स घातल्यानेही घाम कमी येतो. कॉटन किंवा होजियरीचे सॉक्स घालत असाल तर ते दर २ दिवसांनंतर धुतलेच पाहिजेत याची काळजी घ्या.