Spicy Food Effects: मसालेदार पदार्थांची चव भारी… पण शरीरावर होतोय परिणाम? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सर्वात आधी तोंड किंवा घशात जळजळ जाणवू शकते. काही वेळाने पोटातही त्याचा परिणाम जाणवतो. विशेषतः ज्यांचं पोट संवेदनशील आहे, त्यांना तिखट जेवणानंतर अस्वस्थ वाटण्याची शक्यता जास्त असते.
काही लोकांना आम्लपित्ताचा त्रास होतो. छातीत आग होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात जळजळ जाणवणे अशी लक्षणं दिसू शकतात. तिखट पदार्थ काही व्यक्तींमध्ये आधीपासून असलेला ॲसिड रिफ्लक्स वाढवू शकतात.
याशिवाय, खूप मिरची खाल्ल्यानंतर काही जणांना पोटदुखी किंवा जुलाबही होऊ शकतात. आतड्यांवर होणाऱ्या परिणामामुळे शौचाला वारंवार होण्याची समस्या काही लोकांना जाणवते. त्यामुळे तिखट खाल्ल्यानंतर शरीर काय संकेत देतंय, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
तिखट पदार्थ म्हणजे ते नेहमीच वाईट, असं म्हणता येणार नाही. खरी गोष्ट आहे ती प्रमाणाची आणि आपल्या शरीराची. काही लोक वर्षानुवर्षे मसालेदार जेवण खातात आणि त्यांना कोणतीही अडचण जाणवत नाही. दुसरीकडे, काहींचं पोट लवकर बिघडतं.म्हणून दुसऱ्याला तिखट चालतं म्हणून आपणही तेवढंच तिखट खावं, असा नियम नाही. आपल्या शरीराची क्षमता ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे.
बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
तुम्हाला झणझणीत पदार्थ आवडत असतील, तर ते पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. मात्र, जेवणात मिरचीचं प्रमाण आपल्या शरीराला सहन होईल इतकंच ठेवणं चांगलं. एकाच वेळी खूप तिखट पदार्थ खाण्यापेक्षा कमी प्रमाणात खाणं अधिक योग्य ठरू शकतं.
हॉट सॉस, चटण्या आणि बाजारात मिळणारे तयार मसाले वापरताना देखील जरा सावध राहा. अशा पदार्थांमध्ये मिरचीसोबत मीठ आणि इतर घटकांचं प्रमाणही जास्त असू शकतं. त्यामुळे प्रत्येक जेवणात त्यांचा भरपूर वापर करण्याची सवय टाळलेली बरी.
विशेषतः तिखट खाल्ल्यानंतर वारंवार पोटदुखी, जळजळ किंवा जुलाब होत असतील, तर त्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. काही दिवस मसालेदार पदार्थ कमी करून फरक पडतो का, हे पाहता येईल.






