पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. पण काहीवेळा बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे पोटात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे ऍसिडिटी, अपचन, गॅस इत्यादी पोटासंबंधित समस्या वाढू लागतात. अपचन झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात, ज्यामुळे पोटात दुखणे, आंबट ढेकर येणे, पित्त वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ऍसिडिटी झाल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. मात्र वारंवार कोणत्याही पेनकिलर गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पोटदुखी, उलटी, मळमळ, गॅस, ऍसिडिटी, पाइल्स, एनल फिशर आणि आतड्यांचा कॅन्सर इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतात. पोट स्वच्छ न झाल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबीचा थर वाढू लागतो, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे आरोग्य सुधारण्यासोबतच पोट आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. चुकीच्या आहारामुळे आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते आणि ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता वाढून अपचनाच्या समस्या उद्भवतात.
पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाते आणि आतड्यांचे हालचाल सुलभ होण्यास मदत होते. याशिवाय अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. सुकलेलं आलं आणि ऑलिव्ह ऑइल बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी मदत करेल. यासाठी रात्री कोमट पाण्यात आल्याचे तुकडे रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून आल्याचे पाणी आणि भिजवलेल्या आल्याचे सेवन केल्यास पोटात जमा झालेली सर्व घाण बाहेर पडून जाईल. तसेच रिकाम्या पोटी लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून सेवन केल्यास शरीराला अनेक सकारात्मक फायदे होतील.
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारते. तसेच रोजच्या आहारात तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन न करता, सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कोरफडीचा रस प्यायल्यामुळे आतडे मऊ होतात आणि पचनक्रिया सुधारते.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे शौचाची वारंवारता आठवड्यातून तीनपेक्षा कमी होणे.शौचास कठीण होणे, कोरडे होणे आणि शौचास जोर लावावा लागणे ही लक्षणे दिसू शकतात.
बद्धकोष्ठतेपासून बचाव कसा करावा?
आपल्या आहारात फायबरयुक्त फळे, भाज्या आणि धान्ये यांचा समावेश करा.दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि शरीराला हायड्रेटेड ठेवा.रोज नियमितपणे व्यायाम करा. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते.
बद्धकोष्ठतेची कारणे:
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी असल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता (निर्जलीकरण) बद्धकोष्ठतेचे एक प्रमुख कारण आहे. नियमित व्यायामाचा अभाव असल्यास आतड्यांची हालचाल मंदावते.