'या' शक्तीशाली भाज्या लिव्हर- किडनीसाठी ठरतील वरदान!
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, मानसिक तणाव, जंक फूडचे अतिसेवन, पौष्टीक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, अपचन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कामातून वेळ काढत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे लिव्हर आणि किडनीचे आरोग्य बिघडून जाते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. हे घटक किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहेत. शरीरात जाणवू लागलेला थकवा कमी करण्यासाठी अनेक लोक बाजारात मिळणारे वेगवेगळे मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट, गोळ्या आणि औषधांचे सेवन करतात. मात्र तात्पुरता परिणाम दिसून येतो. मात्र कालांतराने पुन्हा एकदा शरीरात अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. कारण शरीरात दिसून येणारी अतिशय सामान्य लक्षणे कालांतराने मोठे स्वरूप घेतात आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांत प्रशिक्षित पचनतज्ज्ञ आणि हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी किडनी आणि लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. शरीर डिटॉक्स करण्यासाठी नियमित आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीर स्वच्छ होते.
लाल रंगाचे चविष्ट बीट संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बीट खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते. यामध्ये बीटाईन आणि नायट्रेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्ताची कमतरता भासत नाही. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया सुधारेल, रक्ताची कमतरता भरून निघेल आणि त्वचा कायमच हायड्रेट राहील.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव घेतल्ल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण पालेभाज्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. पालक, मेथी, चाकवत, सरसोंची पाने इत्यादी भाज्यांचे नियमित सेवन करावे. या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम, फोलेट आणि प्रीबायोटिक, फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया तयार होतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील अम्लता कमी होते आणि रक्तशुद्धी होऊन शरीरात ऊर्जा वाढते.
गाजर खाल्ल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. पण एवढेच नसून रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे नियमित गाजर खावे. यामध्ये कॅरोटिनॉइड्स विटामीन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. गाजर खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली फायबरची कमतरता भरून निघते आणि पचनक्रिया सुधारते. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांचे शोषण होण्यासाठी गाजर खावे.
यकृताच्या आरोग्यासाठी काय करावे:
प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर कमी करा. फळे, भाज्या, चरबीयुक्त मासे (उदा. सॅल्मन) आणि हळद यांचा आहारात समावेश करा.अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा किंवा टाळा.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे:
प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.प्रक्रिया केलेले, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.
पचनाच्या सामान्य समस्या आणि लक्षणे:
पोटात दुखणे हे पचनक्रियेतील एक सामान्य लक्षण आहे.अनेकदा अन्न नीट न पचल्यास मळमळणे किंवा उलट्या होणे ही लक्षणे दिसतात.






