स्तनाच्या कर्करोगासाठी करण्यात येणारे फिश टेस्टिंग काय असते
FISH अर्थात फ्लुरोसेन्स इन सिटू हायब्रिडायझेशन चाचणी ही एक अनुवांशिक चाचणी आहे जी कर्करोगाच्या पेशींमधील विशिष्ट जनुकात काही बदल झाले आहेत का हे पाहण्यासाठी करण्यात येते. याचा वापर सामान्यतः स्तनाच्या कर्करोगाच्या निदानामध्ये एचईआर2 जनुक तपासण्यासाठी केला जातो. एचईआर2 म्हणजे ह्युमन एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर2, हे एक असे प्रोटीन आहे जे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास मदत करते.
सुमारे 20% स्तनाच्या कर्करोगांमध्ये, एचईआर2 जनुक जास्त प्रमाणात दिसून येते, म्हणजेच जनुकाच्या अतिरिक्त प्रती असतात, ज्यामुळे कर्करोग अधिक वेगाने वाढतो. या प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगाला एचईआर2 -पॉझिटिव्ह म्हणतात. याबाबात अधिक माहिती दिली आहे, डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी. (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे ही चाचणी?
FISH टेस्टिंग म्हणजे नेमके काय
एफआयएसएच चाचणी स्तनाच्या कर्करोगाच्या ऊतींच्या नमुन्यात एचईआर2 जनुकाशी जोडलेले फ्लोरोसेंट रंग वापरून कार्य करते. या रंगांमुळे डॉक्टरांना हे पाहणे सोपे होते की एचईआर2 जनुकाच्या जास्त प्रती आहेत किंवा प्रमाण जास्त आहे. चाचणी मध्ये एचईआर2 जनुकांची वाढ (बऱ्याच प्रती) झाल्याचे दिसत असल्यास कर्करोग एचईआर2 -पॉझिटिव्ह मानला जातो. नसल्यास, कर्करोग एचईआर2 -निगेटिव्ह आहे, याचा अर्थ त्याला वेगळ्या उपचार पद्धतीची आवश्यकता असू शकते.
हेदेखील वाचा – स्तनपानामुळे होतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी, तज्ज्ञांचा खुलासा
FISH टेस्टिंगचे महत्त्व
फिश टेस्टिंगचे महत्त्व काय आहे आणि कशी केली जाते
एफआयएसएच चाचणीचे महत्त्व, ही चाचणी डॉक्टरांना स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी गरजेनुसार उपाय योजना ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. एचईआर2 -पॉझिटिव्ह स्तनाचा कर्करोग वेगाने वाढतो आणि पसरतो, यासाठी विशिष्ट उपचारांची आवश्यकता असते. रुग्णावर ट्रॅस्टुझुमॅब (हर्सेप्टिन) किंवा इतर एचईआर2 -लक्ष्यित औषधांसारखे उपचार करता येतील का हे ठरविण्यात एफआयएसएच चाचणी मदत करते.
या थेरपीमध्ये, सामान्य, निरोगी पेशी सोडून कर्करोगाच्या एचईआर2 प्रथिने तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करण्यात येतो. यामुळे उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते आणि पुन्हा त्रास होण्याचा धोका कमी करतो.
योग्य उपचारासाठी आवश्यक
योग्य उपचारासाठी फिश टेस्टिंगचा उपयोग होतो
एफआयएसएच चाचणी न केल्यास रुग्णांना त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगासाठी योग्य उपचार मिळू शकत नाहीत. स्तनांचे सर्व कर्करोग एक सारखेच असतात असे नाही, म्हणून कर्करोग एचईआर2 -पॉझिटिव्ह आहे की एचईआर2 -निगेटिव्ह आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एचईआर2 स्थिती जाणून घेऊन, डॉक्टर उपचार पर्यायांबद्दल योग्य निर्णय घेऊ शकतात जेणेकरून योग्य परिणाम होऊन लवकर बरे होण्याची शक्यता वाढते.
हेदेखील वाचा – Breast Cancer चा सर्वाधिक धोका कोणाला? 40 व्या वर्षी स्वतःची तपासणी का करावी
महत्त्वाचे साधन
थोडक्यात एफआयएसएच चाचणी म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि उपचाराचे एक महत्त्वाचे साधन. यामुळे कर्करोग एचईआर2 -पॉझिटिव्ह आहे की नाही हे ठरविण्यात मदत मिळते, डॉक्टरांना रुग्णासाठी सर्वात प्रभावी उपचार निवडण्यासाठी मार्गदर्शन करते. एचईआर2 -पॉझिटिव्ह स्तनाचा कर्करोग असलेल्या व्यक्तींसाठी, एफआयएसएच चाचणीमुळे कर्करोगा वर थेट मात करण्याचे उपाय डिझाइन करता येतील, ज्यामुळे वैयक्तिक गरजेनुसार उपचार करणे शक्य होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढेल.