लग्नानंतर फिरायला जाण्याला 'हनीमून'च का म्हणतात? कुठून आला हा शब्द आणि कसा आला ट्रेंडमध्ये, इतिहास जो करेल तुम्हाला थक्क! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Honeymoon Origin : नवविवाहित जोडप्यांसाठी ‘हनिमून’ ही केवळ सहल नसून एक विशेष अनुभव असतो. लग्नाच्या गडबडीनंतर जोडपं एकमेकांसोबत वेळ घालवतं, नवे आयुष्य सुरू करतं. आज हनिमून ही एक सामान्य आणि उत्सुकतेची गोष्ट झाली असली, तरी ही परंपरा खरंतर भारतात नव्हे, तर १९व्या शतकातील ब्रिटनमध्ये सुरू झाली, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हनीफंड या ऑनलाईन विवाह नोंदणी प्लॅटफॉर्मच्या सीईओ सारा मॅरागुलिस यांच्या मते, १८०० च्या उत्तरार्धापर्यंत हनिमूनची कोणतीही स्पष्ट परंपरा नव्हती. ही संकल्पना त्या काळात ब्रिटनमध्येच उदयास आली. मात्र, काही संशोधकांचा असा विश्वास आहे की युरोपियन समाजाने ही संकल्पना भारतातील परंपरेवरूनच घेतली.
‘हनिमून’ हा शब्द सर्वप्रथम १६व्या शतकात रिचर्ड हुलोट यांनी वापरला. त्यावेळी या शब्दाचा अर्थ नवविवाहित दाम्पत्याच्या प्रेमाचा आरंभिक गोड काळ असा घेतला जात असे. यात “हनी” म्हणजे गोडवा आणि “मून” म्हणजे एक कालखंड किंवा बदलता काळ. हुलोट यांनी १५५२ मध्ये नमूद केलं होतं की, लग्नानंतर सुरुवातीला आनंदी असलेली जोडपी नंतर दुःखीही होतात. हे वाक्य त्या काळातील नातेसंबंधांविषयी सांगून जातं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत
अनेक लोकांचा विश्वास आहे की बॅबिलोनियन संस्कृतीत हनिमूनसदृश संकल्पना होती, जिथे नवविवाहितांना लग्नानंतर मधापासून बनवलेलं खास शरबत दिलं जायचं. तसेच, ब्रिटिशांनी भारतात राहिल्याच्या काळात पाहिलं की लग्नानंतर नवविवाहित जोडपी नातेवाईकांच्या भेटीला जातात. यामागचा हेतू नातेवाइकांशी ओळख, स्वीकार आणि सामाजिक नातेसंबंधांची जडणघडण असा होता. यात प्रवासाचा भाग नव्हता, पण युरोपियन समाजाने त्यात सहलीचा भाग जोडला, आणि हनिमूनला एक नवीन परिमाण दिलं. कालांतराने हनिमून म्हणजेच विवाहानंतरचा प्रवास, विश्रांती आणि नात्यांचा आरंभ असा अर्थ रूढ झाला.
हनिमून परंपरेचा इतिहास : भारतात नव्हे तर ब्रिटनमध्ये झाला जन्म! आता ‘मिनी मून’चा ट्रेंडही वाढतोय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
काही संशोधकांचा दावा आहे की ‘हनिमून’ हा शब्द नॉर्डिक भाषेतील ‘हजुनोत्स्मानथ्र’ या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ असा की वर आपल्या वधूचं अपहरण करतो आणि तिचं कुटुंब शोध थांबवेल, तोपर्यंत तिला लपवून ठेवतो! अर्थात, ही संकल्पना आता केवळ ऐतिहासिक दृष्टीने उल्लेखनीय आहे.
आजकाल ‘हनिमून’सह ‘मिनी मून’ चा ट्रेंडही प्रचलित होत आहे. यामध्ये जोडपी लग्नानंतर लगेच लांब सहलीऐवजी छोट्या, झपाट्याने पार पडणाऱ्या सहलीला जातात. त्यानंतर भविष्यात मोठी सहल आयोजित केली जाते. हनीफंडच्या सारा मॅरागुलिस सांगतात की, कामाच्या व्यस्ततेमुळे जोडपी लवकर परतणाऱ्या, कमी खर्चिक सहलीला प्राधान्य देत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ढाकामध्ये दुर्गा मंदिराची तोडफोड; भारताने बांगलादेश सरकारला फटकारले, हिंदू सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भलेही हनिमूनची परंपरा भारताची नसून ब्रिटनमधून आलेली असली, तरी भारतीय समाजाने तिला उबदारपणे स्वीकारलं आहे. बदलत्या काळात या परंपरेचे स्वरूप, कालावधी आणि जागा बदलत आहेत. पण त्यामागची भावना एकमेकांना समजून घेणं, एकत्र आयुष्याची सुरुवात करणं आजही तितकीच शाश्वत आणि महत्त्वाची आहे.