बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आहरामध्येही बदल झाले आहेत. अनेकदा कामाच्या गडबडीमुळे घरी जेवण बनवायला वेळ मिळत नाही आणि बाहेरचे ऑर्डर केलेले फूड खाऊन आपले वजन वाढू लागते. तसेच वजन वाढण्यामागचे कारण बिंज इटिंगची म्हणजेच सतत खात राहण्याची सवयदेखील असू शकते. यात लोक एकतर कमी जेवतील मात्र स्नॅक्ससारख्या गोष्टींवर ताव मारतील. नेहमीच्या अशा तेलकट अनहेल्दी खाण्यामुळे हळूहळू हा होईना आपले बरेच वजन वाढू लागते आणि एकदा का हे वजन वाढले की याला पुन्हा नियंत्रणात करणे फार कठीण होऊन बसते.
लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. आजकाल ‘OTT अँड चिल’ हा कॉन्सेप्ट फार ट्रेंड होत आहे. मात्र आपले आवडते शो पाहताना सतत अरबट चरबट खाऊन अनेकांनी आपले बरेच वजन वाढवले आहे आणि आता हे वजन कमी कसे करावे हे त्यांना सुचत नाहीये. अनेकांना वेगवेगळे पदार्थ खायला फार आवडते ज्यामुळे त्यांना आपले वजन तर कमी करायचे असते मात्र त्यांच्याकडून डाएट करणे होत नाही. आज आपण वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा – Zomato डिलिव्हरी बॉय एका दिवसांत किती कमाई करतो? आकडा ऐकून थक्क व्हाल
सोशल मीडियावर हेल्थ अँड वेलनेस कोच दिलशाद याकूबी यांनी एका पोस्टमार्फत बिंज इटिंगनंतर वजन वाढण्याची शक्यता कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा एक उपाय शेअर केला आहे. यात सांगितल्याप्रमाणे फ्लॅक्ससीड, हिमालयन पिंक सॉल्ट (सैंधव मीठ) व कोमट पाणी यांच्या सेवनाने आपले वजन कमी होऊ शकेल. हा उपाय नेमका कसा काम करतो जाणून घ्या.

फ्लॅक्ससीड, हिमालयन पिंक सॉल्ट (सैंधव मीठ) व कोमट पाणी हे तीन घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ‘सिनेर्जिस्टिक प्रभाव’ तयार होतो, जो खाल्ल्यानंतर आपले पोट बिघडण्याची शक्यता कमी होते. फ्लॅक्ससीडच्या सेवनाने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी एकाप्रकारचे ल्युब्रिकेशन आतड्यांमध्ये तयार होते आणि हे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते आणि यामुळे आपले पोट साफ होते.
हिमालयन पिंक सॉल्ट (सैंधव मीठ) हे शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा करण्यास मदत करते. आपण जेव्हा खूप खातो तेव्हा आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण फार कमी होते मात्र जेव्हा तुम्ही कोमट पाण्यातून फ्लॅक्ससीड्स व पिंक सॉल्टचे सेवन करता तेव्हा शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची पातळी स्थिरावली जाते. कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराची सूज कमी होते आणि पचनास मदत मिळते. परिणामी शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात आवश्यक घटकांचे नीट शोषण होते. हे तिन्ही घटक शरीराला फायबर, आवश्यक खनिजे आणि हायड्रेशन देऊन आपले शरीर संतुलित ठेवण्यास मदत करतात.






