एप्रिलमध्ये २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर बडगा! तिकीट तपासणीतून १६.१३ कोटींचे उत्पन्न; मध्य रेल्वेकडून स्वतःचा विक्रम मोडीत
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेला एप्रिल महिन्यात चांगलेच यश मिळाले असून, महसुलातही लक्षणीय वाढ नोंदवली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात २.२७ लाख प्रकरणांचा शोध घेऊन, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १६.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. या विशेष तिकीट तपासणी मोहिमेच्या माध्यमातून मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचेच मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.(फोटो सौजन्य – AI)
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मासिक उत्पन्नाची ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद असून, एप्रिल २०२६ मध्ये मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी मेल व एक्सप्रेस तसेच उपनगरी गाड्यांमध्ये (एसी लोकलसह) अनियमित प्रवासाच्या २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत १६.१३ कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.तर, एप्रिल २०२५ मध्ये १.४५ लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत ६.०७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. याचा अर्थ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी विनातिकीट प्रवाशांमध्ये ५६% वाढ नोंदविण्यात आली असून, महसुलात १६६% इतकी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
मेल व एक्सप्रेस तसेच उपनगरी गाड्यांमध्ये, विशेषतः द्वितीय श्रेणी डब्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्यामुळे एप्रिल २०२६ मध्ये १.५८ लाख प्रकरणे आढळली. तर एप्रिल २०२५ मध्ये ही संख्या १.०५ लाख होती. म्हणजेच ५०% वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये रु. १३.०६ कोटी दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २०२५ मध्ये रु. ५.०३ कोटी दंड वसूल करण्यात आला होता, म्हणजेच १६०% वाढ नोंदविण्यात आली आहे.
एप्रिल २०२६ दरम्यान वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट व अनियमित तिकिटाची १२,६९८ प्रकरणे आढळली. त्यांच्याकडून ३९.६६ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर, एप्रिल २०२५ मध्ये १०,४२० प्रकरणे होती. त्यांच्याकडून ३४.३९ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. म्हणजेच अनियमित तिकीट प्रवाशांमध्ये २२% वाढ नोंदविण्यात आली असून, महसुलात १५% वाढ नोंदविण्यात आली आहे.
याप्रकरणी मध्य रेल्वेने प्रवाशांना योग्य व वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करून, गैरसोय व दंड टाळण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.रेल्वे प्रशासन विनातिकीट प्रवासाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण कायम ठेवतअसून प्रवाशांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व सोयीस्कर प्रवास देण्यासाठी कटिबद्ध आहे.सुरक्षित प्रवास करा, जबाबदारीने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करावा, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.






