पुणे : शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या “कारवाई ब्रेक”नंतरही पुन्हा कारभाराची परिस्थिती “जैसे थी”च झाल्याने अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचा सर्व कारभार “कडक शिस्ती”च्या अधिकाऱ्यांकडे सोपवत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना रिपोर्ट करण्याचे आदेश देत कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता वाहतूकीला नाही पण, वाहतूक शाखेला तरी शिस्त लागेल, अशी अपेक्षा पोलीस दलातचं व्यक्त केली जात आहे.
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे वाहतूक शाखेचा कार्यभार देण्यात आला असून, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे वेळोवेळी नवटके यांना वाहतूक शाखे संदंर्भातील कामकाज व कर्तव्याचा अहवाल सादर करतील असे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले असून, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी देखील वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतचं वाहतूक शाखेला शिस्त लागेल, अशी अपेक्षा आहे.
शहरात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण आहेत. पण, त्यानंतरही वाहतूक पोलीस चौकातील नियोजन न करता आपला कोपरा धरून दंड वसूलीवर भर देत असल्याचे पाहिला मिळाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर ठप्प होत असतानाही हे वाहतूक पोलीस रस्त्यांवर थांबायला तयार नसल्याचे दिसल्यानंतर सह पोलीस आयुक्तांनी कारवाई बंदचे आदेश देत रस्त्यांवर उभा राहून वाहतूक नियमन करण्यास सांगितले. पण, त्याचा परिणाम या वाहतूक शाखेवर झाला नाही. त्यात एका तरुणाने अलका चौकात वाहतूक पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलन केले. तत्पुर्वी वाहतूक शाखेच्याच एका पोलीस निरीक्षकांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या बॉडीगार्डची अतिवरिष्ठांकडे तक्रार केल्याचे प्रकरण नुकतेच घडले होते. अशा अनेक कारणामुळे वाहतूक शाखा सतत चर्चेत होती.
पण, आता वाहतूक शाखेला शिस्त लागेल अशी अपेक्षा असून, त्यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी ठोस पाऊल उचलले आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मनुष्यबळाचे देखील कारण दिले जात असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी वाहतूक शाखेला देत वाहतूक नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात रस्त्यांवर वाहतूक पोलीस उभा असल्याचे पाहिला मिळणार असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा फायदा देखील होणार आहे.