ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर या सहा महापालिकांचा समावेश आहे. मागील चार दिवसांत या सहा महापालिकामधील एकूण ६१८ सदस्य पदांसाठी शिवसेना पक्ष कार्यालयातून ३३४८ इच्छुकांनी मुलाखतीचे अर्ज सादर केल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.
खासदार म्हस्के म्हणाले की ठाणे महापालिकेत १३१ सदस्य असून पक्ष कार्यालयात १२७७ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेची सदस्य संख्या ११२ असून यासाठी ६८२ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेची सदस्य संख्या ७८ असून यासाठी शिवसेनेकडे ३८५ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.
नवी मुंबई महापालिकेत १११ सदस्य संख्या असून एकूण ४९६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती वाशी येथे शनिवारी होतील, असे खासदार म्हस्के म्हणाले. भिवंडी निजामपूर महापालिकेत ९० जागा असून यासाठी १७६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. ९६ सदस्य संख्या असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी ३३२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महायुतीमधून महापालिका निवडणूक लढवेल, अशी घोषणा यापूर्वीच केलेली आहे. त्यानुसार महापालिकांच्या स्तरावर शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. मुंबईतून २७०० हून अधिक इच्छुकांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखत दिली होती. यात प्रामुख्याने महिला उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.






