खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना ३७ टक्के सुधारीत पैसेवारी झाली जाहीर झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Farmer: किनवट: यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले असून कपाशीची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रारंभी काढलेली नजर अंदाज पैसेवारी ३७ पैसे इतकी होती. पुढे खरीप पिकांची स्थिती आणखीनच बिकट झाल्याने तहसील प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली, तीही पूर्वीइतकीच ३७पैसे निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील एकूण १९१ गावांमध्ये पैसेवारी लागू असून लागवडीयोग्य क्षेत्र ८१ हजार ७४.७८ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात ७९हजार १४१ हेक्टरवर पेरणी झाली, तर २ हजार २२८.७८ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात एकूण १२ अतिवृष्टीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. महसूल मंडळनिहाय पाहता जलधारा मंडळात ९, शिवणीमध्ये ७, सिंदगी मोहपूरमध्ये ५, इस्लापूर, मांडवी, दहेली आणि उमरीबाजार मंडळात प्रत्येकी ४ तर किनवट व बोधडी मंडळात प्रत्येकी ३ अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. अशा प्रकारे एकूण ४३ वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जिरायती पिकांचे तब्बल ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पूरस्थितीमुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे ५६ हजार ६३४ हेक्टरवरील जिरायती पिकांचे तब्बल ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका १७६ गावांतील ५१ हजार ४८८ शेतकऱ्यांना बसल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. साधारणपणे पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत असेल तर पीकस्थिती गंभीर मानली जाते, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पैसेवारी उत्तम स्थिती दर्शवते. त्यानुसार शासन ओला किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत देते.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार डॉ. शारदा बोंडेकर यांनी ३० सप्टेंबर रोजी खरीप हंगाम २०२५ ची हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ महसूल मंडळांतील निवडक सज्जांमध्ये हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीत प्रत्येकी तीन पीक कापणी प्रयोग घेऊन गाव पैसेवारी समितीच्या सहकार्याने सुधारीत पैसेवारी निश्चित करण्यात आली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या किनवट तालुक्यातील नऊही महसूल मंडळांतील ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी अपेक्षेप्रमाणे नजरअंदाज इतकीच म्हणजेच ३७ पैसे (५० पैशांपेक्षा कमी) निघाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल प्रशासनाकडून अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासनाने सवलती केल्या लागू
शासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुके आपत्तीग्रस्त घोषित केले असून, बाधितांना दुष्काळसदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सर्व सवलती देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती, तिमाही वीज देयकात माफी, परीक्षा शुल्कात माफी आणि दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफीची तरतूद करण्यात आली आहे.






