सौजन्य - नवराष्ट्र टीम
वनपुरीजवळील उदाचीवाडीमध्ये काही दिवसापूर्वीच एका शेतकऱ्याला सायंकाळच्या वेळी एक बिबट्या दिसला होता. त्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त होती. या भीतीतून बाहेर येत नाही तोपर्यंतच सोमवारी सकाळी वनपुरीच्या सुतार मळ्यात शेतकऱ्यांना सकाळी सकाळीच एका वाघिणीचे दर्शन झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दौंड वन विभागाच्या रेस्क्यू टीमला तातडीने पाचारण केले होते.
त्यानंतरही वनपुरी गावच्या मगरवस्ती परिसरात सलग बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती. श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर यांनीही वन विभागाचे अधिकारी सागर ढोले यांच्यासह पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत आदींना निवेदन देवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत वन प्रशासनाने वनपुरीच्या सुतार मळ्यात तातडीने पिंजरा बसवून नागरिकांना एकप्रकारे दिलासा दिला आहे.
सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वन रक्षक योगेश नजन, धनंजय देवकर, रणजीत चव्हाण, वन कर्मचारी नवनाथ मेमाणे, किशोर कुंभारकर यांनी पिंजरा बसविला आहे. श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी महामुनी, लंकेश महामुनी, तुकाराम महामुनी, शरद कुंभारकर, भगीरथ कुंभारकर, सुनील कुंभारकर, अक्षय कुंभारकर, संदीप महामुनी, राजेंद्र महामुनी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
तातडीने पिंजरा बसवावा
ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभागाने तातडीने सुतार मळ्यात पिंजरा बसविला आहे, त्यामुळे या परिसरात पुन्हा बिबट्या किंवा वाघ आल्यास त्याचा बंदोबस्त होईलच. मात्र वनपुरीच्या मगर वस्ती आणि कुंभारवळणच्या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत आहे. त्यामुळे या भागात वन विभागाने तातडीने पिंजरा बसवावा, अशी मागणी माजी सरपंच रामदास कुंभारकर, महेश मगर, सुदाम कुंभारकर, ज्ञानदेव खेडेकर तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था ठेवावी
नागरिकांच्या मागणीनुसार जिथे आवश्यक आहे. त्या परिसरात वन विभागकडून तातडीने पिंजरे बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्या बरोबरच शेतकऱ्यांनी समूहाने काम करावे, रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी. सद्यस्थितीत शक्यतो रात्रीची शेतीची कामे टाळावीत. घराच्या परिसरात पुरेशी विद्युत व्यवस्था ठेवावी, असे आवाहन सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी केले आहे.






