शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Crime) ताब्यात घेतली. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर (MLA Sticker) पुरविले होते त्यानेच या गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे.
शिक्रापूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावलेल्या चारचाकी गाड्या नेहमी फिरत असून शिक्रापूर पोलिसांनी संशयास्पद गाड्यांची चौकशी आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. त्यावेळी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर असलेली एक गडद काळ्या काचांची तसेच नंबर नसलेली स्विफ्ट गाडी फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनतर त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कार ताब्यात घेतली.
ही चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांची चांगलीच धावपळ झाली. तर याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, असला गंभीर प्रकार सहन केला जाणार नसून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. ज्या आमदाराने या गाडीसाठी स्टिकर पुरविले त्यांची देखील चौकशी केली आहे. तर पोलिस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गाडीवर तब्बल 17 चलन
शिक्रापूर पोलिसांनी जप्त केलेल्या डमी आमदाराच्या कारला फक्त पाठीमागील बाजूने नंबर असून, तो देखील खूप पातळ अक्षरात आहे, मात्र, सदर कारवर तब्बल17 पावत्यांचा दंड असून दंडाची रक्कम देखील 35 हजार असल्याने ही कार खरेच आमदाराची आहे का? असा देखील प्रश्न आहे.