चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्ल्यानंतर पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे, सुरेखा हिवाळे दांपत्य आपल्या मुलांसह राहते. राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या राजू याने सुरेखा हिच्या पोटावर चाकून वार केले.
या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी मुंबई येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर राजू पसार झाला आहे याप्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.