डोंबिवली : बेकायदेशीररीत्या विनापरवाना विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राम उर्फ शिवा कनोजिया असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून विदेशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे पिस्तूल कुठून आणले कोणत्या उद्देशाने जवळ बाळगले तो कुणाला ते विक्री करणार होता का याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत. दरम्यान शिवाविरोधात याआधी देखील मानपाडा, डोंबिवली,पनवेल, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे पिस्तूल बाळगणे व पिस्तूल खरेदी विक्री करण्या प्रकरणी सहा गुन्ह्यांची नोंद आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पोलीस सतर्क झाले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील टाटानगर परिसरात एक इसम बेकायदेशीर रित्या विनापरवाना पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने टाटा नाका परिसरात सापळा रचत राम उर्फ शिवा याला अटक केली. त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आली आहेत. या विदेशी बनावटीच्या पिस्तूलवर मेड इन चायना असा मजकूर लिहिण्यात आला आहे. शिवाविरोधात याआधी देखील डोंबिवली, विष्णू नगर मानपाडा, डोंबिवली, पनवेल शहर, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे पिस्तूल बाळगणे, खरेदी विक्री करणे याप्रकरणी सहा गुन्हे दाखल आहेत. शिवा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.