रस्ता नसल्याचा रुग्णाला पुन्हा फटका; झोळीतून नेण्यात आले रुग्णालयात (संग्रहित फोटो)
सफाळे : रस्त्याअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यात आता सफाळे पश्चिम येथील टेपाचापाडा (पाटीलनगर) भागात रस्ता नसल्याने नागरिकांना अक्षरशः दररोज त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी या भागातील एका वयोवृद्ध महिलेला अचानक अस्वस्थता जाणवली. तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. मात्र, रस्ता नसल्याने ग्रामस्थांना तिला चादरीत झोळी करून उचलत तब्बल दीड किलोमीटर चालत न्यावे लागले. पुढे पक्का रस्ता मिळालेल्या ठिकाणाहून तिला वाहनाद्वारे विरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मागील तीन वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेक वेळा तक्रारी, अर्ज आणि विनंत्या करूनही अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात हीच वाट चिखलमय बनते, त्यामुळे शाळकरी मुले, गर्भवती महिला, आणि वृद्धांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिकांच्या मते, रेल्वे रुळांवर मालगाड्या थांबवल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होतात, आणि त्यातच योग्य रस्ता नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत मदत मिळणे अशक्य बनते.
हेदेखील वाचा : Marathwada News : पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकर सरसावले; मराठवाड्यात जीवनावश्यक वस्तू -अन्नधान्य आणि औषधांचा ताफा रवाना
टेपाचापाडा परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, रेल्वे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना या समस्येबाबत कळविले आहे. ‘आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करत आहोत, पण प्रशासन कानाडोळा करत आहे. आज एका रुग्णाला झोळीतून न्यावं लागलं, कुणाचा जीव जाईल, हे सांगता येणार नाही’, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
तातडीने उपायाची मागणी
या भागात तातडीने पक्का रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.