कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला
ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर २, प्लॉट क्रमांक १२ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये घडली. तळमजल्यावर विद्यार्थ्यांचा घरगुती क्लास सुरू असताना अचानक पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलीस, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन तसेच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
अग्निशमन विभागाने एकूण १२ विद्यार्थी आणि एक शिक्षिका अशा १३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना अपेक्स हॉस्पिटल, काहींना साई स्नेहदीप हॉस्पिटल तर एका विद्यार्थ्याला नवी मुंबई महानगरपालिका वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनीष मसे (वय १४) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाकडून देण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना देखील व्यक्त होत आहे. दरम्यान, स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण काय याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
हृदयद्रावक! ट्रक-कारच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू
बचाव कार्यात सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये सिद्धांत गुप्ता (८), प्रिन्स सोनी (११), आयशा, कुसुम (१५), निष्का धनवाडे (१४), आराध्या बोडसे (१४), तन्वी श्रीवास्तव (७), देवांश पुजारी (१२), राजदीप वानखेडे (१०), पार्थ खैरनार (१४), रुद्र येलूरकर (५) आणि शिक्षिका शामली चौधरी (५३) यांचा समावेश आहे.
नवी मुंबई शहरात कोपरखैरणेच नव्हे तर विविध नोड्समध्ये अनेक जुन्या इमारती सध्या धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र आहे. विशेषतः वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, सीबीडी बेलापूर, सानपाडा, तुर्भे आणि ऐरोली परिसरातील काही इमारती २० ते ३० वर्षे जुन्या झाल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या इमारतींमध्ये भेगा पडणे, स्लॅब कमकुवत होणे, प्लास्टर कोसळणे अशा घटना अधूनमधून घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी महापालिकेने इमारतींना धोकादायक म्हणून नोटिसा देखील बजावल्या आहेत. मात्र पुनर्विकास रखडणे, रहिवाशांमध्ये एकमत नसणे आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी वेळेत होत नाही. इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाने नियमित स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?






