पुणे : पुण्यातील वंचितचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी अनोखी शक्कल लढवत थेट ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट दिला आहे. पुण्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये आयसीयूतील एका रुग्णाला उंदरानं चावा घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता.
ससून रुग्णालय प्रशासनाला अशा घटनांप्रती गांभीर्यानं पावलं उचलावीत. या भेटीबाबत मोरे यांनी सोशल मीडियावरुन यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, गुरुवारी वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून बातमी आली, अपघातानं जखमी झालेल्या तरुणाचा ससून हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात अॅडमिट असताना उंदरानं चावा घेतल्यामुळं मृत्यू झाला.
म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे आम्ही भेट दिले. जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठे पिंजरे आणण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला.