लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा
कर्जत : कर्जत तालुक्यातील लाल मातीवर नवी मुंबई, मुंबईमधील बगीचे आणि मैदाने हिरवीगार होत आहेत.मात्र त्या लाल मातीची विनापरवाना वाहतूक कर्जत तालुक्यातून केली जात असल्याचे उघड झाले आहे.महसूल विभागाने 20 जानेवारीचे रात्री कारवाई करताना दोन हायवा गाड्या पकडल्या आहेत.मात्र त्या गाड्या रात्रीच्या अंधारात सोडण्यात आल्याने महसूल खात्याने केलेल्या कारवाई बद्दल साशंकता निर्माण झाली आहे.माती उत्खनन मुरबाड तालुक्यात सुरू असल्याने महसूल विभाग कशाप्रकारे कारवाईचा बडगा उगारला जाणार याकडे लक्ष लागले आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील जमिनीमध्ये असलेल्या लाल मातीचे कुतूहल महानगरातील शहरवासीयांना आहे.लाल माती ही रोपवाटिका आणि गार्डन तसेच मैदानासाठी महत्त्वाची समजली जाते.त्याच लाल मातीवर डोळा ठेवून माती उत्खनन आणि मातीचे चोरटी वाहतूक सुरू आहे. गेल्या तीन चार वर्षापासून हा गोरख धंदा सुरू असून मागील वर्षी एप्रिल महिन्यात कर्जत तहसीलदार यांच्याकडून कारवाई सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात मातीची तस्करी थांबली होती.परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा लाल मातीचे उत्खनन सुरू झाले असून लाल मातीची वाहतूक कर्जत तालुक्यातील रस्त्यावरून सुरू आहे.गेली महिनाभर ही वाहतूक रात्री आठ पासून पहाटे पर्यंत सुरू असताना रस्त्यांची दुरवस्था होत असल्याच्या तक्रारी आदिवासी भागातील ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे अशा अवैद्य वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी साळोख ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ करीत होते.
महसूल विभागाला याबद्दल माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्या सूचनेने महसूल विभागाने 20 जानेवारीचे रात्री लाल मातीची अवैद्य वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्यांवर कारवाई करण्यात आली.महसूल विभागाच्या पथकाने मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करणारे लाल मातीने भरलेले एक हायवा वाहन कडाव येथे ताब्यात घेतले.ते वाहन कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यास सांगून नायब तहसीलदार आणि तीन गाव महसूल अधिकारी तलाठी यांचे पथक कर्जत मुरबाड रस्त्याने कळंब कडे जात असताना आणखी एक हायवा गाडी महसूल खात्याला चकवा देऊन पुढे गेली.त्यानंतर महसूल खात्याच्या मदतीला काही आदिवासी तरुण आले आणि त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या हद्दीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणखी एक लाल मातीने भरलेली हायवा गाडी अडवून ठेवली.त्या गाडीचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री एक वाजता केला आणि ती गाडी नेरळ पोलिस ठाणे यांच्या कळंब आऊट पोस्ट येथे आणून उभी करण्यात आली.
महसूल खात्याचे पथक साळोख ग्रामपंचायत हद्दीत लाल मातीची अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात होती. त्यावेळी मुरबाड तालुक्याचे हद्दीत तब्बल आठ हायवा गाड्या आणि एक प्रो क्लेम मशीन तेथे माती काढण्याचे काम करीत सुरू होते.त्या ठिकाणी कर्जत महसूल विभागाचे पथक ठाणे जिल्ह्याची हद्द असल्याचे कारण देऊन त्या उत्खनन कडे महसूल खात्याने दुर्लक्ष केले.त्यामुळे कर्जत महसूल खात्याच्या या कारवाई करताना मुरबाड तालुका तहसील कार्यालयाशी संपर्क करून करावी अशी मागणी होत आहे.
या अवजड वाहनांची वाहतूक यामुळे कर्जत तालुक्यातील साळोख पादीर वाडी रस्त्याची धूळधाण उडाली आहे.त्या रस्त्याचे डांबरीकरण कोण करून देणार? हा विषय समोर आला आहे.
लाल मातीची तस्करी कर्जत पाठोपाठ आता मुरबाड तालुक्याच्या हद्दीत सुरू झाली आहे.त्याचा परिणाम कर्जत महसूल विभाग आणि मुरबाड महसूल विभाग यांनी एकत्रित कारवाई करून लाल मातीचे उत्खनन थांबवावे अशी मागणी होत आहे.






