पुणे : धनादेश न वटल्याने न्यायालयाने एकास 12 लाख रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी हा आदेश दिला. हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी धनादेश (Cheque Bounce) दिला होता. मारुती नारायण आबनावे (वय ४९, रा. फुरसुंगी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
आर्थिक अडचण असल्याने आबनावे यांनी त्याचे शेजारी असलेले भाऊसाहेब जगन्नाथ पवार (वय ५०, रा. फुरसुंगी) यांच्याकडून सहा लाख रुपये हातउसने स्वरूपात घेतले. मी कर्जासाठी अर्ज केला आहे. तसेच मला कर्ज मंजू झाले आहे. एक महिन्यात रक्कम मला मिळेल. मग तुला पैसे परत करतो, असे आश्वासन आबनावे यांनी पवार यांना दिले होते. पवार यांनी पैसे परत मागितली असता आबनावे यांनी त्यांना सहा लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, ते वटला नाही. त्यामुळे, पवार यांनी नोटीस पाठवून पैशांची मागणी केली. त्यावेळी आबनावे यांनी आपण केवळ ६० हजार रुपये घेतल्याचा दावा केला. या प्रकरणी पवार यांनी लष्कर येथील न्यायालयात अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांच्यामार्फत आबनावे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता.
आबनावे यांनी धनादेशाची रक्कम बुडविण्यासाठी कायद्याचा पुरेपूर गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. त्यातून खटला सात वर्षे लांबविला आहे. त्यामुळे रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाई मिळावी आणि आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. मुळे यांनी युक्तिवादादरम्यान केली. यावेळी, मी केवळ ६० हजार रुपये घेतले व ते परत केले, असा दावा आबनावे यांच्याकडून करण्यात आला. मात्र, ॲड. मुळे यांनी बँक व्यवहार आणि इतर पुराव्यांच्या आधारे आबनावे यांच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढले.






