सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर विक्रीवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जैन बोर्डिंग हाऊसची जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्यात आली असून, यात मुरलीधर मोहोळांचीही भागीदारी असल्याचा आरोप जैन समाजाकडून कऱण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या दोन सहकारी बिल्डरांना जैन समाजाची जागा हडपल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. या प्रकरणावरुन आता काँग्रेसही आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरुन प्रतिक्रीया दिली आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या, हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असे सपकाळ म्हणाले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेवरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. या परिसरात दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन अशी दोन वसतिगृहे आहेत. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची उभारणी केली होती. अलीकडच्या काही महिन्यांत या जागेवर नवीन विकास प्रकल्प राबविण्याच्या विश्वस्तांच्या प्रस्तावामुळे वाद निर्माण झाला. काही समाजबांधवांनी या विकास योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र, अलीकडेच ही जागा परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या जमीनविक्रीस मंजुरी देताना संबंधित नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले. तसेच या व्यवहारात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असून, त्या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.