कोरेगाव: कोरेगाव नगरपंचायतीमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असणार्या मुख्याधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचे कोरेगाव तहसील कार्यालयासमोर गेली सात दिवस ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार शशिकांत शिंदे,प्रा.नितिन बानुगडे होते.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमदार शशिकांत शिंदे आणि रमेश उबाळे यांच्याकडून कोरेगाव नगरपंचायतीतील मुख्याधिकारी आणि सत्तारूढ नगरसेवक यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील कोट्यावधी रूपयांच्या गैरव्यवहाराची सविस्तर माहिती घेतली. आणि मुंबई येथील मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊन कोरेगाव नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अंबादास दानवे यांनी उपस्थित आंदोलन करणाऱ्या रमेश उबाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांना दिले. कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या(उध्दव ठाकरे)गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीतीच्या निमित्ताने अंबादास दानवे कोरेगाव येथे आले होते.