वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी?
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता. गेल्या अनेक वर्षापासून नाशिक-पुणे रोडचे विस्तारीकरणाचा प्रश्न भिजत पडला असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाच कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी या रस्त्याचे रूंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने तीन महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव पाठविण्यात आला.
त्यात प्रामुख्याने सिमेंटचा संपुर्ण रस्ता करून व्हाईट टेंपींग करणे, मुख्य चौकातील वाहतूकीचा प्रश्न लक्षात घेवून अंडरपास करण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता.
रस्त्याचे रूंदीकरण झाल्यास द्वारका चौकातून थेट नाशिकरोडच्या उड्डाणपुलापर्यंत विना विघ्न वाहने पास होतील अशा प्रकारे रस्त्याच डिझाईन केलेले असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिल्ली येथील झालेल्या बैठकीत या रस्त्याचे व्हाईट टॅपींग करण्यास व पर्यायाने क्रॉकींटीकरण करण्यास नकार देण्यात येवून डांबरीकरणानेच रस्ता तयार करण्याच्या सुचना करण्यात आल्या व त्यासाठी नवीन सुधारीत डीपीआर पाठविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने गेल्या आठवड्यात नवीन डीपीआर पाठविला असला तरी, अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.
सुधारित डीपीआरनुसार द्वारका ते नाशिकरोड दरम्यान सुमारे २४६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात असला तरी, सिंहस्थापूर्वी सदरचा महामार्ग विकसीत होण्याविषयी साशंकता आहे. येत्या महिनाभरात सहा पदरी रस्त्याचे काम हाती घेतले तरच कुंभमेळ्यापुर्वी काम पुर्ण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नवीन सुधारित डीपीआर सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडूनच या रस्त्याचे काम केले जाणार असले तरी, अद्याप त्याला अंतीम मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.






